पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या वाढली, अफगाणिस्तानात घट

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानलाच दहशतवादी कारवायांचा मोठा फटका बसत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 2022मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2022मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दहशतवादी कारवायांमध्ये सुमारे 120 टक्के अधिक बळी गेले आहेत. याउलट, तालिबान राजवट असलेल्या अफगाणिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

ऑस्ट्रेलियास्थित इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या वार्षिक ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. त्यानुसार, 2022मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये 643 लोकांचा मृत्यू झाला. आधीच्या वर्षी 292 नागरिकांचा बळी गेला होता.

सन 2022मध्ये दहशतवादी घटनांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ध्यानी घेता पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर बुर्किना फासो हा आफ्रिकन देश आहे. बुर्किना फासोत 2022मध्ये दहशतवादी घटनांमध्ये 1135 लोक मरण पावले. तर, 2021मध्ये 759 लोकांचा बळी गेला होता. पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 55 टक्के लोक हे सैन्यदलातील किंवा पोलीस कर्मचारी आहेत. टीटीपी आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या पाकिस्तानमधील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना आहेत, ज्यांनी शेजारच्या देशांतही अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत.

या अहवालानुसार, 2007पासून 2022पर्यंत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये 14,920 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील अफगाणिस्तान सीमा भागात दहशतवादी घटना अधिक घडल्या आहेत. पाकिस्तानमधील एकूण दहशतवादी घटनांपैकी 63 टक्के घटना अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात घडल्या आहेत. त्याच वेळी, एकूण मृत्यूंपैकी 74 टक्के मृत्यू येथे झाले आहेत.

सन 2022मध्ये पाकिस्तानमधील बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इस्लामिक स्टेट खोरासानचा प्रभाव पाकिस्तानमध्येही वाढत आहे आणि या दहशतवादी संघटनेने 2022मध्ये पाकिस्तानात 23 दहशतवादी हल्ले केले, ज्यामध्ये 78 लोकांचा मृत्यू झाला.

अफगाणिस्तानला दहशतवादाचा सर्वाधिक फटका
ग्लोबल टेररिझम इंडेक्सच्या अहवालात अफगाणिस्तानचा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश असा उल्लेख करण्यात आला आहे. तथापि, एक चांगली गोष्ट म्हणजे 2022मध्ये अफगाणिस्तानमधील दहशतवादी घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण 58 टक्क्यांनी कमी झाले आहे. यासोबतच दहशतवादी घटनाही 75 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये 2022मध्ये दहशतवादी घटनांमध्ये 633 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 2021मध्ये हा आकडा 1499 होता.

अफगाणिस्तानात तालिबानच्या पुनरागमनामुळे दहशतवादी घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी महिला, माजी सरकारी अधिकारी आणि मानवाधिकार यांच्यावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, 2022मध्ये इस्लामिक स्टेट खोरासान सर्वात सक्रिय दहशतवादी संघटना म्हणून समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये या दहशतवादी संघटनेने 2022 मध्ये 422 लोकांची हत्या केली होती.