नवी दिल्ली : 1986 मध्ये पहिल्यांदा दाखल झालेल्या खटल्याचा तब्बल चार दशकांनंतर अखेर निकाल लागला आहे. दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे हा खटला सुरू होता. नॅशनल ज्युडिशियल डेटाग्रिडनुसार, दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेला हा सर्वात जुना फौजदारी खटला होता. हा खटल्याचा निकाल देणारे राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) दीपक कुमार हे त्यावेळी दोन वर्षांचे होते. आता 41 वर्षांचे असलेल्या दीपक कुमार यांच्यासमोर या खटल्याची गेल्या पाच महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आरोपीने गुन्हा मान्य करण्याचा निर्णय घेतल्यावर 40 वर्षांनंतर खटल्याचा निकाल लागला आहे. (The oldest case in the lower courts of Delhi finally got a verdict)
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्च 1986 रोजी सीबीआयने पंजाब अँड सिंध बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक, नवी दिल्ली आणि बँकेचे मुख्य दक्षता अधिकारी यांनी फसवणुकीचा आरोप करणाऱ्या दोन तक्रारी एकत्रित करून संबंधित खटला दाखल केला होता. खटला दाखल होण्याच्या दोन वर्षांनंतर 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात आरोपींनी फसवणूक करून आणि त्यांच्या खात्यात बेकायदेशीरपणे पैसे जमा करून बँकेचे 32 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप होता. तसेच 78 वर्षीय एसके त्यागी यांच्यावर 1984-85 मध्ये पंजाब अँड सिंध बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांनी खात्यात फेरफार करून, खोट्या क्रेडिट नोंदी करून आणि खात्यात पैसे नसतानाही पेमेंटसाठी चेक क्लिअर करून फसवणूक केली होती.
28 मे 2001 रोजी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 13 वर्षांनी तीस हजारी न्यायालयाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जेपीएस मलिक यांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 477 अ आणि 120 ब अंतर्गत आरोप निश्चित केले. जुलै 2019 मध्ये हा खटला राऊस अव्हेन्यू कोर्टात वर्ग करण्यात आला. त्यावेळी एसके त्यागीसह चार आरोपींविरुद्ध गेल्या 6 वर्षांपासून खटला सुरू होता. मात्र चार आरोपींपैकी सुभाष गर्ग नावाचे दोन आरोपी आणि आरके मल्होत्रा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एसके त्यागी यांच्यावर हा खटला सुरू होता.
हेही वाचा – AAP : परिस्थिती बिकट! आपच्या कार्यालयाला तीन महिन्यांपासून टाळे, प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी अनभिज्ञ
फसवणूक प्रकरणावर 29 जानेवारी 2025 रोजी सुनावणी झाली. त्यावेळी एसके त्यागीची न्यायाधीश दीपक कुमार यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी त्यागीने न्यायालयाला आपला गुन्हा मान्य करत असल्याचे सांगत सौम्य शिक्षेची मागणी केली. त्यागीने न्यायालयाला सांगितले की, त्यांचे वय आता 78 वर्ष आहे आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नाही. माझ्या पत्नीच्या उत्पन्नावर मी अवलंबून असून माझ्य पत्नीला पार्किन्सन आजार आहे. तसेच बँकेतून घेतलेले पैसे वन-टाइम सेटलमेंट (ओटीएस) स्वरूपात परत केले आहेत. त्यामुळे केलेल्या कृतीबद्दल मला पश्चात्ताप असून भविष्यात असे पुन्हा करणार नाही, असे आश्वासन एसके त्यागी याने दिले.
एसके त्यागीची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश दीपक कुमार यांनी म्हटले की, दोषीने पश्चात्ताप करण्याची इच्छा दाखवली आहे, म्हणून त्याला देशाचा उपयुक्त नागरिक बनण्यासाठी सुधारणेची योग्य संधी दिली पाहिजे. तसेच, गुन्हेगाराला अशी शिक्षा दिली पाहिजे की त्यामुळे इतर समान विचारसरणीच्या लोकांना गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करण्यापासून परावृत्त केले जाईल. त्यामुळे न्यायालयाची वेळ संपेपर्यंत आरोपीला कोठडीत राहावे लागेल. तसेच त्यागीला प्रत्येक गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंडही ठोठावण्यात येत आहे.
हेही वाचा – Sunita Williams : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतताच आजारांनी वेढणार, नेमकं कारण काय?