केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीरच्या किंमती केल्या कमी

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करत माहिती दिली.

remdesivir injection

महाराष्ट्रासह भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य विभागावर ताण आला आहे. त्यातच कोरोनावर उपायकारक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ राज्यातच नाही, तर देशात रेमडेसिवीरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करत दिली.

रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांशी चर्चा

सरकारच्या हस्तक्षेपानंतर ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’च्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या युद्धात सरकारला मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल मी औषध कंपन्यांचे आभार मानतो, असे मनसुख मांडवीया त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांशी चर्चा केली होती. देशात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने या इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचे आणि उत्पादन वाढवण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले होते. त्यामुळे आता उत्पादकांनी रेमडेसिवीरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.