नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीतील रामलीला मैदानावर आज ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने लोकशाही वाचवा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संविधान वाचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे मोठे विधान केले आहे. (The responsibility to save democracy is on us Sharad Pawars big statement in India Aghadi meeting)
हेही वाचा – Sharad Pawar : लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर; इंडिया आघाडीच्या सभेत पवारांचे मोठे वक्तव्य
लोकशाही वाचवा रॅलीला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, मोदी सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्र्यांना आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. याशिवाय विविध राज्यांतील अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. मोदी सरकारची ही कृती लोकशाहीवर आणि संविधानावर हल्ला करणारी आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सुनीता केजरीवाल यांचा भाजपावर निशाणा
लोकशाही वाचवा रॅलीत उपस्थितांना संबोधित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, केजरीवाल यांनी तुरुंगातून तुमच्यासाठी संदेश पाठवला आहे. मात्र हा संदेश वाचण्यापूर्वी मला तुम्हाला काही विचारायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या पतीला तुरुंगात टाकून बरोबर केले का? केजरीवालजी हे खरे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत, यावर तुमचा विश्वास आहे का? भाजपावाले म्हणतात की, केजरीवाल तुरुंगात आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. पण तुम्हालाही वाटतं का त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे का? असा प्रश्नांचा भडीमार करत तुमचे केजरीवाल सिंह आहेत, त्यामुळे त्यांना ते जास्त काळ तुरुंगात ठेवू शकणार नाही, असा विश्वासही सुनीता केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – Ramlila Maidan : एक व्यक्ती-एक पक्षाचे सरकार घालवण्याची वेळ आली; रामलीला मैदानावरुन उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
केजरीवालाचा कोठडीतून देशवासियांना पत्राद्वारे संदेश
अरविंद केजरीवाल यांचा पत्रातील संदेश वाचताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, चला स्वप्नातला भारत घडवूया जिथे सर्वांना पोटभर अन्न, प्रत्येकाच्या हाताला काम, चांगले आरोग्य, शिक्षण आणि सर्व सुविधा मिळतील. चांगल्या भारतात सर्वांना न्याय मिळेल. समाजात एकोपा असेल. गरीब लोकांना वीज मोफत मिळेल. प्रत्येक गावात सरकारी शाळा बनवू, प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक बनवू. प्रत्येक जिल्ह्यात विशेष सरकारी रुग्णालय उभारू. त्यामध्ये प्रत्येकाला मोफत उपचार मिळतील. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सुविधा देणार, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणार, अशी आश्वासने देतनाच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्रात म्हटले की, सध्या देशात सुरू असलेल्या कारवाया, वातावरण यामुळे भारत आणि भारतमाता खूप दु:खी आहे. परंतु भारतात दडपशाही चालणार नाही. कारण इंडिया आघाडी केवळ गठबंधन नाही तर प्रत्येकाच्या हृदयात इंडिया आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला एकदा संधी द्या, मग आपण विकसित भारत घडवू या. अटकेमुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढला आहे, असा विश्वासही अरविंद केजरीवाल यांनी पत्रातून व्यक्त केला.