घर देश-विदेश मुंबईतील बैठकीचा 'तोच' संदेश, ठाकरे गटाचा इंडिया आघाडीवरून मोदी सरकारला इशारा

मुंबईतील बैठकीचा ‘तोच’ संदेश, ठाकरे गटाचा इंडिया आघाडीवरून मोदी सरकारला इशारा

Subscribe

मुंबई : देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. चीनपुढे गुडघे टेकणाऱ्या आजच्या भारतास विजयी करण्यासाठी ही ‘इंडिया’ची वज्रमूठ सज्ज आहे. राज्यांचा स्वाभिमान, प्रांतांची अस्मिता, सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती व त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे, तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’चा गरुड पक्षी झेपावला आहे! मुंबईतील बैठकीचा तोच संदेश आहे, असा इशारा ठाकरे गटाने मोदी सरकारला दिला आहे.

हेही वाचा – Narendra Modi तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान? परदेशातील भारतीयांना विश्वास, सर्वेक्षणावर भाजपा खूश

- Advertisement -

‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. मुंबईत तिसऱ्या बैठकीचे आयोजन आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी होत आहे. भाजपाने इंडिया आघाडीची इतकी धास्ती घेतली की, स्वयंपाकाचा गॅस 200 रुपये स्वस्त केला. बैठका वाढत जातील तशी ही स्वस्ताई वाढत जाईल. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीची ही कमाल आहे. तीन वर्षांत स्वयंपाकाचा गॅस 1103 रुपयांवर जाऊन पोहोचला. तो ‘इंडिया’ आघाडीचा जोर वाढल्यावर खाली आला. ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील प्रमुख नेते मुंबईत उतरले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव पाटण्याहून मुंबईला निघाले तेव्हा विमानतळावर त्यांना पत्रकारांनी विचारले, ‘मुंबईत का निघाला आहात?’ लालूंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले, ‘मोदींच्या नरड्यावर बसण्यासाठी!’ मोदी ही व्यक्ती नसून लोकशाहीचा मुडदा पाडणारी हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीशी हा लढा आहे. ‘पी.एम. मोदी की गर्दन पर चढने जा रहे है!’ असे लालू यादव सांगतात. ही लोकांची संतप्त भावना आहे. त्याच संतापाच्या ठिणगीतून ‘इंडिया’ आघाडीचा जन्म झाला आहे, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ममता बॅनर्जींकडून रक्षाबंधनानिमित्त नवे ऋणानुबंध; राजकीय मैत्रीचे बंधही आणखी बळकट

‘इंडिया’ आघाडीची ऐक्याची वज्रमूठ हळूहळू घट्ट होत आहे. 27 पक्ष एकत्र आले व त्यांच्यात कोणतीही ईर्षा नाही. भारतीय जनता पक्षाने कितीही टीका केली तरी ‘इंडिया’ आघाडी ही एक स्फोटक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला 2024 च्या आधीच उलथवून टाकेल, अशी भीती त्यांना मनातून वाटते. ही भीती त्यांच्या कृतीवरून आणि अस्वस्थ हालचालींवरून दिसते, असा दावा या अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisment -