गिलगिट बाल्टिस्तानमध्ये बंडाचा झेंडा, आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची चिंता वाढली

इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भारतासमवेत वाटाघाटी करण्याची भूमिका घेतलेली असतानाच गिलगिट बाल्टिस्तानमध्ये बंडाचा आवाज उठला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आर्थिक गर्तेत सापडलेला पाकिस्तानला नागरिकांच्या अन्नधान्याच्या गरजा भागवताना नाकीनऊ आलेले असताना अशा प्रकारे विद्रोहाची ठिणगी पडेल, अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. या प्रदेशाचे भारतामध्ये विलीनीकरण करण्याची मागणी आंदोलकांची आहे.

पाकिस्तानच्या मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांनी गिलगिट बाल्टिस्तानमधील अशा निदर्शनांकडे दुर्लक्ष केले आहे. तथापि, न्यूज पोर्टल इस्लाम खबरने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी इंटरनेट मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यामध्ये नागरिक पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसतात. आंदोलक भारताच्या लडाखमधील कारगिलला आपला भूभाग जोडण्याची मागणी करताना दिसत आहेत.

पंजाबवगळता पाकिस्तानातील जवळपास सर्व प्रांतांनी पाकिस्तानपासून वेगळे होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, एकाही प्रांताने भारतात विलीन होण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. मात्र आता गिलगिट बाल्टिस्तानने भारतात विलीन होण्याची मागणी केली आहे. इस्लाम खबरच्या वृत्तानुसार, संपूर्ण काश्मीर वादावर पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेच्या दृष्टीने ही मागणी घातक ठरू शकते.

या घडामोडीवर भारताने अद्याप अधिकृतपणे काहीही भाष्य केलेले नाही. पण जेव्हा काश्मीरबाबत पाकिस्तान जागतिक व्यासपीठावर चर्चा करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा भारत या निदर्शनांचा मुद्दा उपस्थित करू शकतो. भारताबरोबरच सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमे या प्रदेशात पाकिस्तानी सैन्याकडून होणारी दडपशाही, स्रोतांचे अन्यायकारक शोषण, महागाई आणि बेरोजगारी यासह इतर मुद्दे सातत्याने मांडत आहेत.