चीनपासून सुरू झालेला कोरोना विषाणू अमेरिकेत थैमान घालत आहे. या प्राणघातक रोगामुळे अमेरिकेत २५ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू घेतल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी थांबवण्याची धमकी दिली होती. मात्र, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी थांबवण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ही घोषणा करत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर, कोरोना जगभर पसरला नाही तोपर्यंत कोरोनाची माहिती लपवली, असा आरोप केला. पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लपवून ठेवणाऱ्या व त्यात गैरप्रकार करण्याऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेचा आढावा घेतला जात आहे. ट्रम्प म्हणाले की, संघटनेने कोरोना साथीच्या बाबतीत पारदर्शकता ठेवली नाही. गेल्या वर्षी अमेरिकेने ४०० कोटी डॉलर्स दिले. ते म्हणाले की, आता आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेला दिलेल्या पैशांचे काय करायचं याचा विचार करू. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोना विषाणूबद्दल चिंता व्यक्त केली.
हेही वाचा – चिंताजनक: मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनवर लक्ष केंद्रीत केल्याचा आरोप केला होता आणि म्हटलं होतं की अमेरिका हा निधी थांबवण्याचा विचार करत आहे. तथापि, अमेरिकेत ६ लाख १३ हजार ८८६ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर कोरोना विषाणूमुळे २६ हजार ०४७ लोक मरण पावले आहेत. एकट्या न्यूयॉर्क प्रांतात मृत्यूची संख्या १० हजार ८३४ वर गेली आहे.