जगाची लोकसंख्या ८ अब्जपार; भारत ठरला सर्वाधिक किशोरवयीन वयोगटाचा देश

२०२२ मध्ये भारतातील ६८ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वयोगटातील आहेत. ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची लोकसंख्या अवघी सात टक्के आहे. तर, १५ ते २९ वयोगटातील म्हणजे तरुणांची संख्या २७ टक्के आहे, अशी माहिती UNPF ने दिली आहे.

world population

नवी दिल्ली – जगाच्या लोकसंख्येने (World’s Population) मंगळवारी ८०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘८०० कोटी आशा, ८०० कोटी स्वप्ने, ८०० कोटी शक्यता, आपली वसुंधरा आता ८०० कोटी नागरिकांचे घर आहे,’ अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (United Nations Population Fund) ट्विट करून ही माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे, या लोकसंख्या वाढीत भारतीयांचे बहुसंख्य योगदान असल्याचंही UNPF ने म्हटलं आहे. तसंच, भारतात सर्वाधिक किशोरवयीन वयोगट असल्याचं सिद्ध झालं आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, असं आतापर्यंत संबोधलं जायचं. परंतु, आता भारत हा किशोरवयीन वयोगटाचा देश आहे, असं म्हटलं तरी संयुक्तिक ठरेल.

भारतात १० ते १९ वयोगटाची म्हणजेच किशोरवयीन वयोगटाची लोकसंख्या २५ कोटी ३० लाख आहे. किशोरवयीन वयोगटातील जगभरात ही सर्वाधिक लोकसंख्या आहे. २०२२ मध्ये भारतातील ६८ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वयोगटातील आहेत. ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची लोकसंख्या अवघी सात टक्के आहे. तर, १५ ते २९ वयोगटातील म्हणजे तरुणांची संख्या २७ टक्के आहे, अशी माहिती UNPF ने दिली आहे.

जगाची लोकसंख्या ८०० कोटी झालेली असताना त्यात भारतीयांचं योगदान अधिक आहे. अखेरच्या अब्ज लोकसंख्येच्या वाढीत सर्वाधिक १७ कोटी ७० लाख लोकांचा वाटा भारताचा असून ७.३ कोटी लोकसंख्येसह चीन दुसऱ्या क्रमाकांवर आहे. म्हणजेच, जगभरात लोकसंख्या वाढीच्या दरांत भारताचा क्रमांक पहिला लागला असून त्यापाठोपाठ चीन आहे. तसंच, पुढच्या वर्षी सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागू शकतो.


भारताची लोकसंख्या

 • २०२२ – १.४१२ अब्ज म्हणजेच १४० कोटी
 • २०५०- १.६६८ अब्ज म्हणजेच १६० कोटी (अंदाजित)

जगाची लोकसंख्या

 • १९६० – ३ अब्ज म्हणजेच ३०० कोटी
 • १९७५ – ४ अब्ज म्हणजेच ४०० कोटी
 • १९८७ – ५ अब्ज म्हणजेच ५०० कोटी
 • १९९९ – ६ अब्ज म्हणजेच ६०० कोटी
 • २०११ – ७ अब्ज म्हणजेच ७०० कोटी
 • २०२२ – ८ अब्ज म्हणजेच ८०० कोटी
 • २०३७ – ९ अब्ज म्हणजेच ९०० कोटी (अंदाजित)
 • २०५८ – १० अब्ज म्हणजेच १००० कोटी (अंदाजित)
 • २०८० – १०.४ अब्ज म्हणजेच १०००४ कोटी (अंदाजित)

इथेही लक्ष द्या

 • १८०० पर्यंत जगाची लोकसंख्या एक अब्ज होती.
 • जगाची लोकसंख्या दोन अब्ज व्हायला जवळपास १०० वर्षे लागली.
 • मात्र, गेल्या १२ वर्षांत लोकसंख्येत सात ते आठ अब्जांची वाढ झाली.