Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश देशात दोन खोमेनी निर्माण झाले आहेत, संजय राऊत यांचे मोदी, अमित शाहांवर...

देशात दोन खोमेनी निर्माण झाले आहेत, संजय राऊत यांचे मोदी, अमित शाहांवर शरसंधान

Subscribe

मुंबई : आज देशात जे नव हिंदुत्वाचे (उद्धव ठाकरे यांच्या भाषेत गोमूत्रधारी हिंदुत्व) वातावरण निर्माण केले आहे, त्यामधून देशात दोन खोमेनी (Ruhollah Khomeini) निर्माण झालेच आहेत व त्यातून असंख्य खोमेनी निर्माण करून देश इराण, सीरिया, अफगणिस्तानच्या पद्धतीने चालवला जाईल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे ‘शुद्ध’ हिंदुहृदयसम्राट होते. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारात भेसळ नव्हती. त्यावेळी धर्मांध खोमेनी याने लोकशाहीवादी राजवट हटवून इराणची सूत्रे हाती घेतली व आधुनिकतेकडे निघालेल्या इराणच्या विकासात खीळ घातली. धर्माच्या बेड्यांत इराणला पुन्हा जखडले. बाळासाहेब ठाकरे यांना मी तेव्हा खोमेनीबद्दल मत विचारले. बाळासाहेब ताडकन म्हणाले, “मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही. अजिबात नाही.’ असे खासदार राऊत यांनी सामना दैनिकातील ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.

- Advertisement -

देशात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे व ती तशीच ठेवली जाईल. नऊ वर्षे राज्य करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे व निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल व पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. या एकाच विचाराने लोकांनी आता एकवटायला हवे. निर्भय व्हायला हवे, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

कर्नाटकच्या प्रचारात बजरंगबलीस उतरवले
कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होत आहे. दक्षिणेतल्या या एकमेव राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता आता डळमळीत होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या प्रचारात यावेळी बजरंगबलीस उतरवले. जय बजरंगबलीचे नाव घ्या व भाजपसाठी मतदानाचे बटन दाबा. हा धार्मिक प्रचार आहे. असा धार्मिक प्रचार केल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यास अपात्र ठरवले होते, याचे स्मरण खासदार राऊत यांनी करून दिले आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुसलमानांचे कार्ड काढणे अपेक्षित होते. दिल्लीचे बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण हा काही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा विषय नव्हता, पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी बाटला हाऊस चकमक नव्याने सुरू केली. ते चालले नाही, तेव्हा महाबली हनुमानास प्रचारात आणले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सरकारी यंत्रणेचा वापर
पंतप्रधानपदावरील व्यक्ती सर्व सरकारी लवाजमा घेऊन पक्षाच्या प्रचारासाठी उतरली. पंतप्रधान म्हणून त्यांना राजकीय प्रचारासाठी सर्व सरकारी सुविधा मिळतात. तो कोट्यवधींचा खर्च पक्षाच्या व उमेदवारांच्या खर्चात धरला जात नाही. मात्र विरोधकांना पै पैचा हिशेब द्यावा लागतो. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर केला म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडच रद्द केली. इथे पंतप्रधानांपासून त्यांचे संपूर्ण कॅबिनेट सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचारात गुंतले आहे, असा आरोप राऊत यांनी ‘रोखठोक’मध्ये केला आहे.

- Advertisment -