श्रद्धा हत्या प्रकरणात सापडले ‘हे’ सबळ पुरावे, पोलिसांचा तपास सुरूच; आज सुनावणी

हे प्रकरण समोर येताच संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. परंतु, आफताब पोलिसांना व्यवस्थित सहकार्य करत नसल्याचं समोर आलं आहे. तो सतत आपली वक्तव्ये बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट करण्याची ठरवले आहे. 

shraddha

नवी दिल्ली – वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी (Shraddha Walkar Murder Case) दिल्ली पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. हत्येचा उलगडा (Delhi Crime) झाल्यापासून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक पुरावे हाती आले आहेत. असं असलं तरीही हे पुरावे पुरेसे नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आपला शोध सुरू ठेवला असून आरोपी आफताबवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणखी काय पावलं उचलतात हे पाहावं लागणार आहे. (Shraddha Murder Case Investigation)

आतापर्यंत या लोकांनी दिला जबाब

 • आफताबने ज्या दुकानातून चाकू विकत घेतला त्या दुकानदाराने पोलिसांना जबाब दिला आहे.
 • आफताबने मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे सांगितले होते. ज्या दुकानदाराकडून आफताबने फ्रीज विकत घेतला होता त्यानेही जबाब नोंदवला आहे. तसेच बिलावर १९ मे ची तारीख आहे. या हत्येसाठी वापरण्यात आलेले फ्रीज सध्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
 • श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करताना आफताबचा हात कापला गेला होता, त्यानंतर त्याला डॉक्टर अनिल सिंह यांच्याकडून टाके पडले. त्या डॉक्टरनेही जबाब पोलिसांकडे दिला आहे.
 • आफताबने स्वतःच श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. (परंतु, न्यायालयात तो आपले म्हणणे मागे घेऊ शकतो.)
 • श्रद्धाच्या मित्र मैत्रीणींनी जबाब नोंदवला आहे. (Shraddha Murder Case Investigation)हेही वाचा – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपीवर खटला न चालवता भरचौकात फाशी द्या; संजय राऊतांची मागणी

फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले नमुने

 • जंगलातून 13 हाडे जप्त करण्यात आली आहेत. ही हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून चाचणीनंतरच ही हाडे श्रद्धाची आहेत की कोणत्या प्राण्याची हे स्पष्ट होणार आहे.
 • आफताबच्या स्वयंपाकघरात रक्ताचे अंश सापडले, जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
 • डीएनए चाचणीसाठी वडिलांच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला आहे.

दरम्यान, आफताबने श्रद्धाच्या खात्यातून ५४ हजार रुपये ट्रान्सफर केले होते. याचीही नोंद पोलिसांनी घेतली आहे.

हेही वाचा मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे ११ तुकडे सापडले, तपासकार्यात सीबीआयची एन्ट्री

पोलिसांकडून या गोष्टींचा शोध सुरू

 • आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने विविध भागात फेकले आहेत. या घटनेला सहा महिने होऊन गेल्याने हे तुकडे सापडणे कठीण आहे. आतापर्यंत सर्व ३५ तुकडे सापडलेले नाही. तसंच, तिचे शीरही सापडलेले नाही.
 • या हत्येसाठी त्याने वापरलेली चाकू किंवा करवतही अद्याप सापडलेले नाही.
 • हत्येवेळी आफताब आणि श्रद्धाने घातलेले कपडे परत मिळालेले नाहीत. जे आफताबने डस्टबिनमध्ये फेकल्याचा दावा केला आहे.
 • श्रद्धाचा मोबाईल फोनही अद्याप सापडलेला नाही.
 • अनेक तांत्रिक तपास अहवाल प्रलंबित आहेत. पोलीस सीसीटीव्ही मॅपिंग करत आहेत. फोन डेटा पुनर्प्राप्त केला जात आहे. पोलिसांनी डेटिंग साइट्सचाही अहवाल मागवला आहे. (Shraddha Murder Case Investigation)

या मर्डर मिस्ट्रीविरोधात आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दिल्ली पोलीस आफताबची जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागू शकतील. आफताबने हत्येची कबुली दिली असली तरीही तो न्यायालयात आपली कबुली मागे घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्याविरोधात सबळ आणि ठोस पुरावे पोलिसांना सादर करावे लागणार आहे.

हेही वाचा Inside Story! श्रद्धाला आधीच होता तिच्या हत्येचा संशय; मित्राला सांगितलं असं काही…

6 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येमुळे आणि पुरावे गमावल्यामुळे, संपूर्ण पोलिस तपास फॉरेन्सिक तपास आणि वैज्ञानिक अहवालांवर अवलंबून आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आफताब पूनावाला याने 18 मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ३०० लिटरच्या फ्रिजमध्ये तीन आठवडे दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी ठेवले आणि टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागात फेकून दिले.

श्रद्धा आणि आफताब पुनावाला यांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र, त्यांच्या प्रेमाला श्रद्धाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ते मे महिन्यात दिल्ली येथे स्थायिक झाले. मात्र, स्थायिक होताच दहाव्या दिवशी आफताबने श्रद्धाची हत्या केली. श्रद्धाने आफताबच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. तसंच, त्यांच्या आर्थिक व्यवहारांवरून भांडणे होत होती. त्यामुळे आफताने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. अनेक दिवस श्रद्धा कोणत्याच सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर सक्रीय नसल्याने तिच्या मित्र मैत्रीणींनी तिची चौकशी करायला सुरुवात केली. अखेर तिच्या मित्र मैत्रीणींनी तिच्या पालकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा हा सर्व प्रकार उजेडात आला. (Shraddha Murder Case Investigation)

हे प्रकरण समोर येताच संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. परंतु, आफताब पोलिसांना व्यवस्थित सहकार्य करत नसल्याचं समोर आलं आहे. तो सतत आपली वक्तव्ये बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट करण्याची ठरवले आहे.