नवी दिल्ली : शेअर बाजार सलग पाचव्या महिन्यात घसरला आहे. आज (28 फेब्रुवारी) फेब्रुवारीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशीही भारतीय शेअर बाजार (BSE) उघडताच मोठ्या प्रमाणात घसरण झाली. सेन्सेक्स 1,414 अंकांनी घसरून 73,198 वर बंद झाला, तर निफ्टी बँक 399 अंकांनी घसरून 48,344 वर बंद झाला. दिवसभरात मोठी घसरण पाहिल्यानंतर निफ्टी 420 अंकांनी घसरून 22,124 वर बंद झाला. महत्त्वाचे म्हणजे 1996 मध्ये सुरुवात झाल्यानंतर निफ्टी सलग पाच महिन्यांत घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय बाजाराने 9 महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. (This is the first time since 1996 that Nifty has fallen for five consecutive months)
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1 वर्षातील नीचांकी पातळीवर घसरले आहेत. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 384.28 लाख कोटी रुपयांवर खाली आले, जे गुरुवारी 393.10 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे आज बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 8.82 लाख कोटी रुपये गमावले आहेत, तर फेब्रुवारी महिन्यात एकूण 40.8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – Bank Holiday In March : मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँक बंद, जाणून घ्या कामकाजाचे दिवस
मागील पाच महिन्यातील नुकसानीची आकडेवारी पाहिली तर या काळात गुंतवणूकदारांचे 91 लाख कोटी रुपये गमावले आहेत. निफ्टी अधिकृतपणे 22 एप्रिल 1996 रोजी लाँच करण्यात आला. निफ्टीच्या स्थापनेपासूनची सर्वात मोठी घसरण जुलै ते नोव्हेंबर 1996 दरम्यान दिसून आली होती. त्यानंतर ५ महिने सतत घसरण झाल्यानंतर निफ्टी 26 टक्के घसरला होता. यानंतर आता गेल्या पाच महिन्यांत 11.68 टक्के घसरण झाली आहे.
पाच महिन्यांत गुंतवणूकदारांचे किती नुकसान?
ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत शेअर बाजाराच्या कामगिरीवर नजर टाकली तर ऑक्टोबरमध्ये बीएसईचे मार्केट कॅप 29.63 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर नोव्हेंबर महिन्यात 1.97 लाख कोटी रुपये गमावले. डिसेंबर महिन्यात 4.73 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. जानेवारी महिन्यात 17.93 लाख कोटी रुपये गमावले. यानंतर फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 40.80 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
हेही वाचा – Delhi stampede : 200 मृत्यूंचा पुरावा काय? न्यायालयाने चेंगराचेंगशी संबंधित याचिका फेटाळली