Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश मोदी-शाहांच्या हिंदुत्वात शांतता प्रस्थापित करण्याचा हाच मार्ग..., ठाकरे गटाचे टीकास्त्र

मोदी-शाहांच्या हिंदुत्वात शांतता प्रस्थापित करण्याचा हाच मार्ग…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : देशात राष्ट्रीय सुरक्षेवर रामबाण उपाय म्हणून आता मोदी सरकारने हनुमान चालिसा पठण, बजरंगबली की जय असा मंत्रोच्चार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मणिपुरातील (Manipur Violence) भडका शमविण्यासाठी ‘राणा’ दाम्पत्यास इम्फाळला पाठवून तेथे अखंड हनुमान चालिसा वाचावी व हिंसाचार करणाऱ्यांपुढे नमते न घेता ‘जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नली’ असा गजर करावा. मोदी-शहांच्या हिंदुत्वात शांतता प्रस्थापित करण्याचा हाच मार्ग आहे, असे जोरदार टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे कर्नाटक निवडणूक प्रचारात धुंद आहेत व तिकडे ईशान्येतील एक प्रमुख राज्य मणिपूर अक्षरशः पेटले आहे. हिंसाचार आणि दंगलींचा भडका असा उडाला आहे की बाजूच्या इतर राज्यांतही त्याचे पडसाद उमटू शकतात, पण सदैव निवडणुका व राजकीय व्यवहारात गुंतलेल्या सरकारला याची कल्पना आहे काय? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात केला आहे.

- Advertisement -

मणिपुरातील भडका हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अपयश आहे. देशाला गृहमंत्री आहेत; पण ते सदैव, सदान् कदा राजकीय विरोधकांच्या विरोधात कारवाया करण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे अतिरेकी, समाजकंटक, राष्ट्रद्रोही शक्तींना मोकळे रान मिळाले आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे वादाची ठिणगी
मणिपूर हे छोटे राज्य आहे, पण देशाच्या ईशान्य सीमेवरील ते महत्त्वाचे संवेदनशील राज्य आहे. काश्मीरप्रमाणे तेथेही अतिरेक्यांचे गट सक्रिय आहेत व ते अनेकदा सुरक्षा दलांवर हल्ले करीत असतात. त्यामुळे मणिपूरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुळात मणिपुरात भडका का उडाला हे समजून घेतले पाहिजे. या अशांततेला मणिपूर उच्च न्यायालयाचा एक निर्णय कारणीभूत ठरला आहे. मणिपूरमधील मैती (Meities) समाजाच्या वतीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून या समाजाचा समावेश आदिवासी प्रवर्गात करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. त्यासंदर्भात या मागणीवर विचार करून चार आठवड्यात उत्तर सादर करावे, असे निर्देश राज्य सरकारला दिले आणि तेथेच मैती आणि इतर आदिवासी समाज यांच्यात वादाची ठिणगी पडली, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

रोहिंग्या मुस्लीम आणि बांगलादेशी घुसखोर वाढले
तूर्त हिंसाचार नियंत्रणात आला असला तरी मैती समाज आणि इतर आदिवासी समुदाय यांच्यातील वाद पुन्हा वाढणे मणिपूरसारख्या संवेदनशील राज्याला आणि देशालाही परवडणारे नाही. मणिपूरमध्ये मैती समाजाचे प्रमाण जवळजवळ 53 टक्के आहे. त्यांचे वास्तव्य तेथील खोऱ्यांमध्ये आहे. मात्र त्या ठिकाणी रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी घुसखोर यांची संख्या वाढू लागली आहे. त्याचा विपरीत परिणाम सर्वच व्यवस्थांवर होत आहे आणि त्याची झळ मैती समाजाला बसत असल्याने तो समाज अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

मणिपूरमधील भडका वेळीच शमला नाही तर…
‘माझं राज्य जळतंय, कृपया मदत करा’ असे ट्वीट ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम हिला ऐन मध्यरात्री करण्याची वेळ का आली? मणिपूरमधील भडका वेळीच शमला नाही तर ईशान्य हिंदुस्थान परत एकदा अस्थिरता, अशांतता आणि फुटीरतेच्या कड्यावर उभा राहील. पण याची जाणीव जातीय आणि धार्मिक संघर्षावरच सत्ताकारण करणाऱ्या केंद्रातील आणि मणिपूरमधील सत्ताधाऱ्यांना आहे काय? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -