रामाच्या अस्तित्वाबाबत संशय घेणारे आता ‘रावण’ घेऊन आले आहेत, मोदींचा पलटवार

अहमदाबाद : मला सर्वाधिक शिव्या कोण देतो, अशी स्पर्धा काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेसला रामसेतूबद्दलही राग आहे. ज्यांचा कधीच रामाच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता, त्यांनी आता रामायणातून ‘रावण’ आणला आहे. एका रामभक्ताला रावण म्हणणे योग्य नाही, असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. जेवढा तुम्ही चिखल उडवाल, कमळ तेवढ्याच वेगाने फुलेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

गुजरातमधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींची तुलना रावणाशी केली. मोदी प्रत्येक निवडणुकीत दिसतात, त्यांना रावणसारखी 100 डोकी आहेत का? अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली होती. त्यावर भाजपा आक्रमक झाली आणि त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. खर्गे यांनी ही टिप्पणी केली नसून ती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून आली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर, संपूर्ण गुजरातचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्याचे मतदान होत असून 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी कलोल येथील जाहीरसभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस मोदी यांना त्यांची औकात दाखवेल, असे खर्गे यांच्याआधी काँग्रेसच्या अन्य एका नेत्याने म्हटले होते, असे पंतप्रधानांनी मधुसूदन मिस्त्री यांचा थेट उल्लेख न करता सांगितले. क्षमा मागण्याचे तर सोडूनच द्या, या नेत्यांना कधीही पश्चाताप झाला नाही, याचे मला आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले.

मी गुजरातचा पुत्र आहे. तुम्ही मला जे गुण दिले आहेत, गुजरातने जी मला ताकद दिली आहे, तीच या काँग्रेस नेत्यांना त्रासदायक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने मोदी ‘कुत्ते की मौत मरेंगे’ असे म्हटले होते, तर दुसर्‍याने मोदी हिटलरच्या मृत्यूने मरतील असे म्हटले होते. कोणी म्हणतात रावण तर कोणी कॉक्रोच म्हणतात. त्यामुळेच मतदानाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.