अनिल अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली; ३ चीनी बँका त्यांच्या परदेशातील संपत्तीवर जप्ती आणणार

anil ambani debt
अनिल अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली

चीनच्या तीन बँकानी अनिल अंबानी यांच्या परदेशात असलेल्या संपत्तीवर जप्ती आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या बँकांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला जवळपास ५ हजार २७६ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. इंडिस्ट्रियल अँड कमिर्शियल बँक ऑफ चीन, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चीन आणि चीन डेव्हलपमेंट बँक या तीन बँकांनी जप्तीचा निर्णय घेतलेला आहे. या बँका आपल्या नियम आणि अधिकारांचा वापर करुन अंबानी यांच्याविरोधात सक्तवसुलीची कारवाई करणार आहेत. जगभरात अनिल अंबानी यांची जिथे संपत्ती असेल त्यावर जप्ती आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शुक्रवारी ब्रिटन कोर्टात सुनावणी सुरु असतानाच अनिल अंबानी यांनी सांगितले होते की, आता त्यांच्या जवळ काहीच उरलेले नाही. तसेच आपल्या पत्नीचे दागिने विकून ते वकीलाची फि देत आहेत. तर चीनी बँकातर्फे बाजू मांडणारे वकील थाँकी क्यूसी यांनी ब्रिटनच्या कोर्टात सांगितले की, “अनिल अंबानी बँकांना एक रुपयाही न देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आता आम्हाला त्यांच्याविरोधात सक्तवसूलीची कार्यवाही करावी लागणार आहे. आमच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. तसेच हे करताना आम्ही आमच्या अधिकारांचा पुर्णपणे वापर करु”

अंबानी यांच्यावरील कर्जाचा तपशील

ब्रिटनच्या कोर्टाने २२ मे रोजी अंबानी यांना आदेश देत तीनही बँकाचे ५ हजार २७६ कोटींचे कर्ज फेडण्यास सांगितले होते. तसेच चीनी बँकांचा कोर्टकचेरीसाठी झालेला ७.४ कोटींचा खर्चही बँकाना परत देण्यास सांगितले होते. व्याज जोडून अंबानी यांच्यावरील कर्ज वाढून जून महिन्यापर्यंत ५ हजार २८१ कोटी पर्यंत पोहोचले होते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चीन बँका अनिल अंबानी यांचे शपथपत्र कोर्टात सादर करण्याची वाट पाहत होते. २९ जून रोजी ब्रिटन कोर्टाने अनिल अंबानी यांना त्याची विदेशातील संपत्ती, एकूण मिळकत, कर्ज, बँकेचे स्टेटमेंट, शेअर सर्टिफिकेट, बॅलन्स शीट याची संपुर्ण माहिती शपथपत्रात देण्यास सांगितली होती. मात्र शुक्रवारी सुनावणीच्या आधीच अंबानी यांनी त्यांचे वित्तीय कागदपत्रे तिसऱ्या कुणालाही दाखवू नयेत, अशी विनंती कोर्टाला केली. कोर्टाने देखील त्यांची ही विनंती मान्य केली.