भयंकर; कुत्र्याच्या तीन नवजात पिलांना १० व्या मजल्यावरून फेकले, मालकाला अटक

याप्रकरणी पोलिसांनी शेखर नावाच्या व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. तो नोएडा येथील बहुमजली इमारतीत राहतो. त्याच्याकडे श्वान आहे. या श्वानाला सहा पिल्ले झाली. त्यातील तीन पिल्ले त्याने फेकून दिली, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस तपासात अन्य तीन पिल्ले घरात सापडली आहेत. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 

street dog
संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः कुत्र्याच्या तीन नवजात पिलांना १० व्या मजल्यावरुन फेकल्याची धक्कादायक घटना नोएडा येथे घडली आहे. एका बहुमजली इमारतीत ही घटना घडली. ही तिन्ही पिल्ले अवघ्या एक महिन्याची होती. दहाव्या मजल्यावरुन फेकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शेखर नावाच्या व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. तो नोएडा येथील बहुमजली इमारतीत राहतो. त्याच्याकडे श्वान आहे. या श्वानाला सहा पिल्ले झाली. त्यातील तीन पिल्ले त्याने फेकून दिली, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस तपासात अन्य तीन पिल्ले घरात सापडली आहेत. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

या इमारतीच्या रहिवासी संघाच्या निदर्शनास ही बाब आली. तळमजल्यावरील एका शेडजवळ या तीन पिल्लांचे शव आढळले. बाजूला एक मोठा खड्डा होता. त्यामुळे त्यांना संशय आला की या पिल्लांना वरुन फेकले गेले आहे. त्यानंतर रहिवासी संघाने इमारतीमधील श्वानांची माहिती घेतली. त्यात शेखर यांच्याकडील तीन पिल्ले गायब असल्याचे त्यांना कळाले. शेखर यांची खिडकी मोठी व सुरक्षित आहे. त्यामुळे ती पिल्ले तेथून खाली पडू शकत नाही. तसेच तिन्ही पिल्लांचे शव आजूबाजूला पडले होते. त्यामुळे पोलिसांनी शेखरला ताब्यात घेतले आहे. पोलीस शेखरची चौकशी करत आहेत.

या घटनेची चौकशी सुरु आहे. पिलांचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. शेखरने सांगितले आहे की पिल्ले त्याच्या खिडकीतून खाली पडली. सध्या तरी या घटनेची कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही, असे नोएडा सेंट्रलचे डीसीपी राम बदन सिंह यांनी सांगितले.

ही घटना दुर्देवी आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्राणी प्रेमी संघटनेनी केली आहे. जर देखभाल करता येत नसेल तर श्वान पाळू नये. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करावी, असेही प्राणी प्रेमी संघटनेने सांगितले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.