Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश "मन की बात"च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले महिलांचे कौतुक, अवयवदान करण्याचे...

“मन की बात”च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले महिलांचे कौतुक, अवयवदान करण्याचे आवाहन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात भागाचा 99वा भाग प्रसारित करण्यात आला. या 99व्या भागाच्या माध्यमातून मोदींनी महिलांचे विशेष कौतुक केले. तर अवयवदान करणे का महत्वाचे आहे, याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांनी सौर ऊर्जा आणिे इतर महत्वाच्या विषयांवर देखील त्यांनी नागरिकांना संबोधित केले.

आज रविवारी (ता. 26 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या “मन की बात” (Mann ki Baat) या कार्यक्रमाचा 99वा भाग सकाळी प्रसारित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महिला शक्तीचे कौतुक करत अवयवदानाचे महत्व आपल्या मन की बातमधून विषद केले. तर यावेळी त्यांनी अमृतसरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबासोबत सुद्धा संवाद साधला.

आजच्या मन की बातमधून नारी शक्तीचे कौतुक करताना ते म्हणाले की, आज भारत नव्या जोमाने सर्वांसमोर येत आहे. यामध्ये आपल्या स्त्री शक्तीचा मोठा वाटा आहे. तसेच यावेळी त्यांनी वंदे भारत ट्रेनच्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट बनलेल्या सुरेखा यादव यांचे कौतुक केले. तर आॅस्कर विजेते निर्माते गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांना मिळालेल्या आॅस्कर पुरस्कारामुळे भारताचे नाव उज्वल झाल्याचे मत व्यक्त केले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अंडर-19 T-20 च्या वर्ल्ड कपमध्ये विजेते पद पटकावलेल्या भारतीय महिला संघाचे सुद्धा कौतुक करत त्यांनी हे विजेतेपद पटकावत इतिहास रचला असल्याचे सांगितले. आज देशातील महिला या तिन्ही सैन्यात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावत आहेत. ग्रुप कॅप्टन शालिजा धामी या लढाऊ युनिटमध्ये कमांड अपॉइंटमेंट मिळवणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी ठरल्या आहेत. त्यांना सुमारे तीन हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे भारतीय लष्करातील शूर कॅप्टन शिवा चौहान या सियाचीनमध्ये तैनात झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. शिवा यांना तीन महिन्यांसाठी सियाचीनमध्ये तैनात केले जाईल, जेथे तापमान-60 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. स्त्रीशक्तीची ही ऊर्जा विकसित भारताची जीवनवाहिनी आहे, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले.

अवयवदानाची सर्वात मोठी भावना ही असते की, मरण येताना सुद्धा कोणाचे तरी भले व्हावे, कोणाचे तरी प्राण वाचावेत. अवयवदानाची वाट पाहणाऱ्यांना प्रत्येक क्षणाची वाट किती कठीण असते हे माहीत असते आणि अशा परिस्थितीत जेव्हा एखादा अवयव दान करणारा सापडतो तेव्हा त्याच्यात फक्त भगवंताचे रूपच दिसते. झारखंडच्या रहिवासी स्नेहलता चौधरी याही अशाच होत्या, ज्यांनी देव बनून इतरांना जीवन दिले. स्नेहलता चौधरी (63) यांनी त्यांचे हृदय, किडनी आणि यकृत दान केले, अशी माहिती देत पंतप्रधानांनी यावेळी अवयवदानाचे महत्व सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मन की बातच्या 100 व्या भागाबद्दल लोक खूप उत्सुक आहेत
असे सांगितले. मन की बातच्या 100 व्या भागाबाबत देशातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, याचा मला आनंद आहे. मला खूप मॅसेज, फोन येत आहेत. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा सुवर्णकाळ साजरा करत आहोत, नवनवीन संकल्प घेऊन पुढे जात आहोत, तेव्हा शंभराव्या ‘मन की बात’ संदर्भात तुमच्या सूचना आणि विचार जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी तुमच्या सूचनांची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या सूचना आणि विचारांमुळे 30 एप्रिलला होणाऱ्या मन की बात चा १००वा भाग अधिकच सुंदर असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – दिल्ली ते गल्लीपर्यंत काँग्रेसचा एल्गार, ‘संकल्प सत्याग्रह’साठी प्रियांका गांधी राजघाटावर, मोठा फौजफाटा तैनात

- Advertisment -