वादळामुळे चार राज्यातील ४१ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Thunderstorm
वादळाचा फटका

देशात विविध ठिकाणी आलेल्या वादळामुळे आता पर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसाना बरोबरच ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा फटका उत्तर भारतातच नव्हे तर देशाच्या दक्षिण भागातही जाणवला. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि दिल्ली येथील काही भागात वादळाने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले. सध्या वादळ शांत असले तरीही सर्तकतेचा इशारा वेधशाळेतर्फे देण्यात आला आहे.

सोसाट्याचा वारा, कडकडणारी वीज अशा रितीने हे धुळीचे वादळ हे देशातील या भागांमध्ये रविवारी आले. गडगडाटी वादळाने आणि वीज कोसळण्याने पश्चिम बंगालमध्ये १२, उत्तर प्रदेशात ११, आंध्र प्रदेशात ९ तर दिल्लीत २ जणांचा मृत्यू झाला. निसर्गाच्या कोपामुळे आतापर्यंत एकूण ४१ जणांचा मृत्यू झाले, तर या वादळात अनेक जण जखमी देखील झाले आहेत.

रविवारी १०९ किमी प्रति तास वेगाने वारे वाहत असल्याचे वेध शाळेकडून सांगण्यात आले. पावसाचा जोर वाढल्याने हे वादळाने रुद्रावतार घेतला आणि त्याचा फटका वाहतुकीला बसला. दिल्ली विमानतळावरील वाहतूक काही काळ ठप्प असल्याने विमान प्रवाशांचे मोठे हाल झाले. यामुळे ४० विमाने इतरत्र वळविण्यात आली, तर २४ विमानांना उशीर झाला. तसेच ओव्हरहेड वायरमुळे झाडे उन्मळून पडल्याने मेट्रो सेवाही ठप्प झाली होती. तसेच हजरत निजामुद्दीन आणि पलवाल रेल्वे स्थानकांदरम्यान झाडे रुळांवर पडल्याने रेल्वेसेवाही विस्कळीत झाली होती. भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी दिल्ली आणि नोएडामध्ये ९६ ते १०९ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. तसेच ४.२ मिमीचा पाऊस पडला असल्याचे वेध शाळेने सांगितले.

उत्तर प्रदेशातील परिस्थिती
उत्तर प्रदेश येथील काही भागात आलेल्या वादळाने १८ जणांचे प्राण घेतले. यात २८ नागरिक आणि ३७ जनावरे जखमी झाले. मृतांमध्ये कासगंज येथील ५ जण, बुलांद्शःर येथील ३ जण, गाझीयाबाद आणि सहारनपूर परिसरातील २ या व्यतिरिक्त इटावा, अलीगढ, कनौज, हापूर, नोएडा आणि सांभाळ या परिसरातील नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगाल, दिल्ली आणि आंध्र प्रदेश येथील परिस्थिती
पश्चिम बंगाल येथील काही भागात मुसळधार पावसामुळे विज कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये ४ लहान मुलांचाही सहभाग आहे. तर आंध्र प्रदेशात नऊ आणि दिल्ली येथे दोघांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास आभाळ पूर्णत: झाकून गेले. वेगाने वाहणारे जोरदार वारे आणि धूळ यामुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण जात होते. जोरदार वादळानंतर काही वेळाने पावसाने हजेरी लावली आणि पारा १० अंशांनी खाली आला. दरम्यान तापमान ४०.६० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. भारतीय हवामान विभागाने शनिवारी उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर तसेच पंजाब, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, छत्तीसगढ, बिहार, तेलंगणा आदी राज्यांना वादळी वारे आणि पावसाचा इशारा दिला होता.