तिग्मांशु धुलिया यांच्या भाचीची दारुड्यांकडून छेडछाड

tigmanshu dhulia
अभिनेता आणि दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया

भारतात महिला सुरक्षित नसल्याच्या घटना रोजच्यारोज समोर येत आहेत. सार्वजनिक ठिकाण असो किंवा कार्यालय महिलांची छेड काढणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भिती उरली नाही, असे दिसते. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलाकार तिग्मांशु धुलिया यांच्या भाचीची छेड काढल्याची घटना घडली आहे. बंगळुरु येथे रविवारी रात्री काही मद्यपी तरुणांनी तिग्मांशु यांच्या भाचीची ट्रेनमध्ये छेड काढली. रेल्वे हेल्पलाईनशी संपर्क साधला असता रेल्वेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिग्मांशु यांनी ट्विटरवर ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला आहे.

तिग्मांशु धुलिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझी भाची उद्यान एक्सप्रेसने बंगळुरुला बी ३ या बोगीने प्रवास करत होती. त्या डब्यात चार मद्यपी तरुणांनी तिला त्रास दिला. यावेळी रेल्वे हेल्पलाईनपैकी कुणीही तिच्या मदतीला आले नाही. ती घाबरलेली आहे. तिला कुणी मदत करु शकते का?”

रात्री ११ वाजून ४१ मिनिटांनी तिग्मांशु यांनी मदतीचे आवाहन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर काही ट्विटर वापरकर्त्यांनी पुढाकार घेऊन संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला. तासाभरातच पीडित मुलीला मदत मिळाली. तिग्मांशू यांनी पुन्हा एकदा रात्री दीड वाजता ट्विट करुन मदत देणाऱ्या लोकांचे आभार मानले.

तिग्मांशु धुलिया यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चरस, शागिर्द, पान सिंह तोमर, साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. तर गँग्स ऑफ वासेपूर, शाहिद अशा चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केलेला आहे.