तिरुपती बालाजी मंदिरातील १४० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, तरिही दर्शन सुरूच

Tirupati Balaji Temple
तिरुपती बालाजी देवस्थान

दक्षिणेतील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील पुजारी आणि इतर कर्मचारी असे मिळून तब्बल १४० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तरिही मंदिरातील सार्वजनिक दर्शन सुरुच आहे. यावर एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना तिरुमाला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे (Tirumala Tirupati Devasthanam (TTD) Board) अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी म्हणाले की, “मंदिरातील दर्शन थांबविण्याचा आमचा कोणताही विचार नाही.”

११ जून पासून जेव्हा अनलॉक १ ची सुरुवात झाली तेव्हापासून मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानंतर मंदिरातील कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये १४ पुजाऱ्यांसहीत १४० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. तरिही मंदिर सुरुच ठेवल्यामुळे हा संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष सुब्बारेड्डी म्हणाले की, सध्या आम्ही मंदिर बंद न करता खबरदारीचे उपाय योजित आहोत. ज्येष्ठ पुजाऱ्यांना कामावर बोलविले जाणार नाही, तसेच पुजारी आणि इतर कर्मचारी यांची निवासाची वेगवेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच मंदिराचे मुख्य पुजारी रमना दीक्षितुलु (chief priest A.V. Ramana Dikshitulu) यांनी ट्विट करत कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. ५० पुजाऱ्यांपैकी १५ पुजाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून २५ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. मात्र असे असतानाही देवस्थानम बोर्डचे संचालक आणि इतर सदस्य दर्शन थांबवायला तयार नाहीत. बोर्डाचे हे कृत्य वंशपरंपरागत चालत आलेली परंपरा आणि ब्राह्मणांच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. हे धोरण तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे असून यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे केली आहे.

सुब्बारेड्डी यांनी मात्र हे आरोप खोडून काढले आहेत. आता मंदिर बंद करण्याइतपत परिस्थिती बिघडलेली नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच माध्यमांवर येऊन या विषयाला राजकीय रंग देणे योग्य नाही.