विरोधी पक्षांच्या एकजुटीला सुरूंग, टीएमसी स्वबळावर लढणार लोकसभा निवडणूक

mamta banerjee on parth chatterjee arrest dont support corruption in ssc scam

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस (टीएमसी) २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (२ मार्च) जाहीर केले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना सुरूंग लागला आहे.
टीएमसी पक्ष कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नसून तो फक्त सामान्य लोकांशी जोडलेला असेल. जर लोकांना भारतीय जनता पार्टीला (भाजपा) सत्तेवरून हटवायचे असेल तर ते आम्हाला मतदान करतील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच जनता आपल्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला. सागरदिघी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बायरन बिस्वास हे २३००० हजार मतांनी विजयी झाले. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे.
पश्चिम बंगालच्या सागरदिघी विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसी पक्षाला मोठा झटका बसला आहे. पोटनिवडणुकीतील जागेवर काँग्रेसचे बायरन बिस्वास विजयी झाले असून टीएमसी देवाशीष बॅनर्जी दुसऱ्या नंबरवर आहेत. भाजपा, काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) किंवा सीपीआय (एम) यांच्यातील हातमिळवणीमुळे काँग्रेसने सागरदिघी पोटनिवडणूक जिंकली असल्याचे मत देवाशिष बॅनर्जी यांनी केले. सागरदिघीमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी २२ टक्क्यांच्या आसपास होती. यावेळी भाजपाने आपली मते काँग्रेसकडे वळवली आणि त्यामुळे त्यांना केवळ १३ टक्के मते मिळाली, असेही त्या म्हणाले.
डाव्या काँग्रेस आघाडीचा नैतिक पराभव : ममता बॅनर्जी
मला डाव्या काँग्रेसला विचारायचे आहे की, ते अशी युती का करत आहेत? डाव्या-काँग्रेस आघाडीने विजय मिळवला असला, तरी त्यांचा हा नैतिक पराभव असल्याचे मत ममता बॅनर्जी यांनी केले. टीएमसीच्या पराभवासाठी मी जनतेला दोष देत नाही. जे जातीय कार्ड वापरतात, त्यांना मी दोष देते असल्याचेही ममता म्हणाल्या. तसेच भाजपा, काँग्रेस आणि माकपा यांच्यात ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला.
अधीर रंजन चौधरी यांनी दिले प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले की, टीएमसीचे भाजपाशी साटेलोटे आहे, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केले. ममता बॅनर्जींचे वक्तव्य ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदींना नक्कीच आनंद होईल. तसेच भाजपाला हुसकावून लावण्यासाठी विरोधी ऐक्याची गरज असताना ममता बॅनर्जी भाजपाशी तडजोड करून स्वत:ला आणि पुतण्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अधीर रंजन चौधरी यांनी केला.
भाजपच्या विरोधात एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते यात्रा काढत आहेत, परंतु टीएमसीने आता स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने त्यांची चिंता वाढू शकते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बुधवारी (१ मार्च) त्यांच्या वाढदिवसानंतर चेन्नईमध्ये यात्रा काढली होती. या यात्रेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचा पुनरुच्चार केला होता.