कर्नाटक : सिद्धरामय्या सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या खरेदी आणि विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यात हुक्का बारवर पूर्णपणे बंदी घातली असून तंबाखूजन्य पदार्थ खरेदीचे कायदेशीर वयही निश्चित केले आहे. बुधवारी कर्नाटक विधानसभेत COTPA कायदा म्हणजेच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सुधारणा केली आहे. सुधारित विधेयक विधानसभेने मंजूर केले आहे. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि तंबाखूजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. (Tobacco Hookah will be closed forever but this new regulation for cigarettes Legal action to be taken in Karnataka)
हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात
सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता राज्यात हुक्का बारवर पूर्ण बंदी असणार आहे. तसेच यापुढे हुक्का बार उघडणे किंवा चालवणे शक्य होणार नाही. तसेच राज्यात आता सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावरही बंदी असेल. विशेष म्हणजे आतापर्यंत तंबाखू उत्पादने खरेदी करण्याचे कायदेशीर वय कर्नाटकात 18 वर्षे होते. मात्र आता हे वय 21 वर्षे करण्यात आले आहे. त्यामुळे आता तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानदारांना 21 वर्षांखालील कोणालाही सिगारेट किंवा तंबाखू विकता येणार नाही. याशिवाय शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बालसंगोपन केंद्रे, आरोग्य केंद्रे, मंदिरे, मशिदी आणि उद्यानांजवळील 100 मीटरच्या अतंरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
1 ते 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
सुधारित कायद्यात शिक्षा आणि दंडाची तरतूदही कडक करण्यात आली आहे. प्रतिबंधित ठिकाणी किंवा तंबाखू आणि सिगारेट 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला विकल्यास 1000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय हुक्का बार उघडणे किंवा चालवणे बंदी घालण्यात आली आहे. यात दोषी आढळल्यास 1 ते 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
हेही वाचा – Politics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा
हुक्का बारवर बंदी का?
कर्नाटक सरकार हुक्का बारवर बंदी घालण्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी करत होता. सरकारने गेल्या वर्षीच्या एका अभ्यासाचा हवाला देताना म्हटले की, 45 मिनिटे हुक्का पिणे म्हणजे 100 सिगारेट पिण्याइतके आहे. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते, हुक्का हा एक मादक पदार्थ आहे. ज्यामध्ये निकोटीन किंवा तंबाखू आणि चव वाढवणारे रासायनिक कार्बन मोनोऑक्साइड असते आणि ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. कर्नाटकात हुक्का बार चालवणाऱ्यांवर दरवर्षी डझनभर गुन्हे दाखल होतात. आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 18, 2021 मध्ये 25 आणि 2022 मध्ये 38 गुन्हे हुक्का बार चालकांविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत.