Corona: देशात २४ तासांत ९०९ नवे रुग्ण, ३४ मृत्यू; एकूण आकडा ८३५६!

coronavirus image
प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर आज पहिली राष्ट्रीय पातळीवरची आकडेवारी समोर आली असून त्यानुसार आजघडीला देशभरात तब्बल ८ हजार ३५६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्याशिवाय एकूण मृतांचा आकडा २७३ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या संध्याकाळी ४ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय एकूण कोरोनाबाधितांपैकी ७१६ जण कोरोनामुक्त झाले असल्याचं देखील आरोग्य सचिवांनी सांगितलं. कोरोनाचा प्रभाव देशभरात वाढत असून सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आढळून आली आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास देशभरातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी सर्वच राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. यावर केंद्र सरकारकडून अद्याप जाहीर घोषणा व्हायची आहे. मात्र, त्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४ एप्रिलनंतर देखील ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.

गेल्या ५ दिवसांत रोज ५८४ नवे रुग्ण

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या ५ दिवसांमध्ये सरासरी रोज ५८४ नवे कोरोनाग्रस्त सापडत आहेत. त्याशिवाय, रोज सरासरी १५ हजार ७४७ जणांची कोरोना चाचणी होत आहे. आत्तापर्यंत देशात १ लाख ८६ हजार ९०६ चाचण्या तपासण्यात आल्या असून त्यामध्ये ८ हजाराहून जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे, देशात खरंच कम्युनिटी स्प्रेडची तिसरी स्टेज सुरू झाली आहे का? अशा चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.