मुंबई : आधुनिक शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च क्षमतेच्या बॅलास्टलेस ट्रॅक (खडीरहित रूळ) स्लॅबची निर्मिती करण्यासाठी कारखाना तयार करण्यात आला आहे. या कारखान्याला सुरुवात देखील झाली असून सुरतच्या किम या गावात सुरू करण्यात आला आहे. हा देशातील सर्वांत मोठा ट्रॅक स्लॅबनिर्मिती कारखाना आहे. 19 एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता 120 ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे. या कारखान्याची पाहणी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. हा कारखाना बुलेट ट्रेन प्रकल्पस्थळापासून जवळ असल्याने वाहतूक आणि पुरवठा वेळेत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रेल्वे रुळांच्या स्थिरतेसाठी काँक्रीट ट्रॅक स्लॅब महत्त्वाची भूमिका बजावतात. (Track slab factory for bullet train project started in Surat)
या प्रकल्पाच्या गुजरात भागातील आणि दादरा-नगर हवेली भागातील 352 कि. मी.पैकी 237 कि.मी. रुळांसाठी सुरतमधील कारखान्यातून काँक्रीट ट्रॅक स्लॅब तयार करण्यात येणार आहेत. हे पूर्वनिर्मित काँक्रीट ट्रॅक स्लॅब साधारणपणे 2200 मि.मी. रुंद, 4900 मि.मी. लांब आणि 190 मि.मी. जाड आहेत. प्रत्येक स्लॅबचे वजन अंदाजे 3.9 टन इतके आहे. या कारखान्याची उत्पादन क्षमता 96000 जे-स्लॅब तयार करण्याची आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅकनिर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाच्या गुजरात भागातील 352 कि.मी.साठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा… Mahayuti : एकनाथ शिंदेंनी सत्ते बाहेर राहण्याची इच्छा व्यक्त केली; शिवसेना नेत्याचा दावा
बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅक स्लॅबवर रूळ बसविण्यात येत असून त्यासाठी स्लीपरची आवश्यकता नसते. यासाठी आधुनिक जपानी तंत्रज्ञानावर आधारित कारखाना तयार करण्यात आला आहे. ट्रॅक स्लॅब निर्मितीच्या कामासाठी अभियंत्यांना विशिष्ट प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा फायदा भविष्यातील विविध प्रकल्पांसाठीही होणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून सांगण्यात आले. या कारखान्याला भेट दिल्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी आपले मत व्यक्त केले. तर महत्त्वाची बाब म्हणजे, जपानमध्ये अवलंबलेल्या पद्धतींवर आधारित ट्रॅकच्या कामासाठी सर्व अभियंत्यांनी जपानी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण अभ्यासक्रम पूर्ण केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.