Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश तुम्हारे बस की बात नहीं! खलिस्तानवाद्यांच्या कारवायांवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारला टोला

तुम्हारे बस की बात नहीं! खलिस्तानवाद्यांच्या कारवायांवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारला टोला

Subscribe

मुंबई : भारतातील लोकशाही धोक्यात आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी लंडन येथे म्हणाले. हा देशद्रोह आहे, असे भाजपवाले म्हणत आहेत. मग त्याच लंडनमध्ये हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयात घुसून खलिस्तानवाद्यांनी तिरंगा उतरवला, धुडगूस घातला हा देशाचा अपमान नाही काय? फक्त निषेध, धिक्कार करण्याशिवाय तुम्ही काय केलेत? लोकशाही व स्वातंत्र्य धोक्यात असून आपल्या तिरंग्याचे रक्षण करायला सरकार म्हणून तुम्ही तोकडे पडला आहात. संसदेत विरोधक बोलत असताना त्यांचे माईक बंद करणे तुमच्या हातात आहे, पण तिरंगा उतरवून धुडगूस घालणाऱ्यांचा देशद्रोह रोखणे ‘तुम्हारे बस की बात नही है!’ असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्र सरकारला लगावला आहे.

आपल्या देशाच्या राष्ट्रीय भावना जगभरात तुडवल्या जात आहेत त्या अंधभक्तांना अजिबात दिसत नाहीत. खलिस्तान चळवळीचा नवा ‘भिंद्रनवाले’ अमृतपाल सिंग याच्या विरोधात पंजाबात कारवाई सुरू होताच त्याचे पडसाद लंडनमध्ये उमटले. लंडनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला व फडकणारा तिरंगा खाली उतरवला, इतकेच नव्हे तर तेथे खलिस्तानचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न झाला, असे प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओवरून दिसते. हिंदुस्थानला 56 इंची छाती असलेले पंतप्रधान लाभले असताना आपला तिरंगा अशा प्रकारे उतरविण्याची छाती अतिरेक्यांची व्हावी हे धक्कादायक आहे, असे ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारला हात झटकता येणार नाही
खलिस्तान चळवळीचे भूत पुन्हा डोके वर काढते आहे व शीख तरुणांची डोकी भडकवली जात आहेत. हे देशाच्या स्थिरतेसाठी चांगले लक्षण नाही. अमृतपाल सिंग हा नवा भिंद्रनवाले ‘वारीस पंजाब दे’ नावाची संघटना चालवतो व त्या माध्यमातून खलिस्तान चळवळ चालवतो. त्याच्या एखाद्या समर्थकावर पोलीस कारवाई करतात तेव्हा तो हजारो समर्थकांसह त्या पोलीस स्टेशनला घेराव घालून त्याच्या माणसांना सोडवून नेतो. हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचा असेलही, पण म्हणून केंद्र सरकारला त्यापासून हात झटकता येणार नाहीत, असेही या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे.

अमृतपाल सिंगला पाकिस्तानातून आर्थिक मदत
पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेवरील राज्य आहे. पंजाबात अशांतता राहावी म्हणून पाकिस्तानच्या हालचाली सुरूच असतात. कश्मीरप्रमाणेच पंजाब जरा जास्तच स्फोटक व संवेदनशील आहे, पण कश्मीरच्या बाबतीत जे ‘सर्जिकल स्ट्राइक’ राजकारण केले जाते ते पंजाबच्या बाबतीत होत नाही. कारण येथे भाजपाला हिंदू-मुसलमान हा राजकीय झगडा लावता येत नाही व त्याचा लाभ घेता येत नाही. आज पंजाब पुन्हा एकदा अशांत होत आहे व त्यामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. अमृतपाल सिंग हा पाकिस्तानी आयएसआयचा हस्तक म्हणून काम करीत आहे. दुबईतील ‘आयएसआय’ मुख्यालयातून पंजाबातील खलिस्तानी चळवळीस नव्याने बळ मिळत आहे. याचा अर्थ अमृतपाल सिंगला पाकिस्तानातून आर्थिक मदत मिळत आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

धर्म आणि राजकारण यांची गल्लत
पंजाबच्या भूमीवरून हिंदुस्थान अशांत व अस्थिर करण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे व येथे मोदींचे सरकार राजकीय विरोधकांच्या मागे हात धुऊन लागले आहे. एका भिंद्रनवालेमुळे पंजाबसह देशात रक्ताच्या नद्या वाहिल्या. इंदिरा गांधींचे बलिदान त्या हिंसेत झाले. आज नवा ‘भिंद्रनवाले’ निर्माण होऊ पाहत असेल तर त्याला वेळेतच खतम केले पाहिजे. आपल्या देशात धर्म आणि राजकारण यांची गल्लत नव्याने सुरू झाली आहे. देशभरात हिंदुत्वाच्या नावाखाली जे ‘जिहाद’ आक्रोश मोर्चे निघत आहेत त्यामागचे खरे सूत्रधार भाजपवाले आहेत. उद्या त्याच सूत्राने इतर धर्मीयांनी असे जिहादी मोर्चे काढले तर पुन्हा एकदा अराजकसदृश धर्मयुद्ध उभे राहील. त्यात देश व तिरंगा दोन्ही होरपळून निघतील, असा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे.

लोकशाही, स्वातंत्र्य व देश धोक्यात
खलिस्तानची नवी भुताटकी डोके वर काढत आहे. लंडनमध्ये तेच घडले. कॅनडामध्येही तेच घडत आहे. हिंदुस्थानात त्या अशांततेची सुरुवात झाली आहे. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूची मात्रा सध्या जरा जास्तच वाढली आहे. तिरंग्यास हात घालेपर्यंत यांची धुंदी वाढली आहे. इंग्लंडचा युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकविण्यासाठी लाखो लोकांनी त्याग केला. त्या त्यागात कोणतेही योगदान नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याचा हा परिणाम आहे. लोकशाही, स्वातंत्र्य व देश धोक्यात आहे. अंध भक्तांना ते दिसत नाही इतकेच! त्यांचा हिंदुस्थान वेगळा असावा! असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisment -