टीव्हीवरील चर्चेतून सर्वाधिक प्रदूषण

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णांची टिप्पणी

दिल्लीच्या प्रदूषणाच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी माध्यमांना आरसा दाखवला आहे. टीव्हीवरील चर्चासत्रांमधून सर्वाधिक प्रदूषण फैलावले जात आहे. प्रत्येकाचा आपला अजेंडा असून ते आपला अजेंडा राबवत आहेत, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी प्रसारमाध्यमांना आरसा दाखवला आहे.

शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर धसकटं जाळली जात आहेत. त्यामुळे दिल्लीत हवेचे प्रदूषण निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांनी किती प्रमाणात धसकटं जाळली पाहिजे यावरून वाद सुरू आहे. या प्रकरणावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी हे विधान केले आहे. टीव्हीवर होणार्‍या डिबेटमधून दुसर्‍यांपेक्षा अधिक प्रदूषण फैलावले जात आहे. त्यांना काही कळत नाही. ते संदर्भ सोडून विधाने करत असतात. प्रत्येकाचा स्वत:चा अजेंडा असतो, असे एन.व्ही. रमण्णा यांनी सांगितले.

सॉलिसिटर तुषार मेहता यांनी मीडियाने चालवलेल्या बातमीकडे कोर्टाचे लक्ष वेधले होते. धसकटं जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण वाढल्याचे विधान केले होते. मात्र, मीडियाने हे विधान चुकीच्या पद्धतीने चालवले. त्यामुळे माझ्याबाबत चुकीच्या प्रतिक्रिया उमटल्या असे तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले.

माझ्या विरोधात टीव्हीवरून बेछूट आरोप लावण्यात आले. मी धसकटं जाळण्याच्या मुद्यावरून कोर्टाची दिशाभूल केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला. हे निखालस खोटे आरोप आहेत. हे मला इथे आवर्जुन सांगायचे आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले. त्यावर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी तुम्ही कोर्टाची दिशाभूल केलेली नाही, असे स्पष्ट केले.