धक्कादायक! दिल्लीत दोन विद्यार्थ्यांना भरधाव कारने चिरडले, एकाचा मृत्यू

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या एसडीए मार्केटजवळ काल रात्री एक मोठा अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थ्यांना भरधाव कारने चिरडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल मंगळवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास आयआयटी दिल्लीच्या गेट क्रमांक १ जवळ घडली. या अपघातात अशरफ नवाज खान (३०) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर अंकुर शुक्ला (२९) या विद्यार्थ्यावर साकेत येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले जात आहे.

एसडीए मार्केटमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून दोघेही रस्ता ओलांडत होते. यादरम्यान नेहरू प्लेसकडून येणाऱ्या भरधाव कारने दोघांना धडक दिली. तसेच ही कार घटनास्थळावरून काही अंतर दूर गेली. या कारचीही दुरावस्था झाली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री आयआयटी दिल्लीच्या एसडीए मार्केटजवळ रस्ता ओलांडताना कारने दोन विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. अशरफ नवाज खान आणि अंकुर शुक्ला हे दोघेही आयआयटीमधील पीएचडीचे विद्यार्थी आहेत. या अपघातातील कार आणि चालकाची ओळख पटली असून पुढील चौकशी दिल्ली पोलिसांकडून केली जात आहे.


हेही वाचा : बंगळुरूमध्ये दुचाकी स्वारानं वृद्धाला नेलं फरफटत , व्हिडीओ व्हायरल