इटावा : ‘द बर्निंग ट्रेन’ हा चित्रपट तर आजवर सर्वांनीच पाहिला असेल. परंतु, प्रत्यक्षात 24 तासांच्या आत अशा दोन दुर्घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथे घडल्या आहेत. काल (ता. 15 नोव्हेंबर) इटावाजवळ नवी दिल्ली-दरभंगा हमसफर एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली होती. ही आग इटावा जवळील सराय भूपत स्टेशन जवळ लागली. नवी दिल्ली दरभंगा हमसफर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात आग लागली. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी डब्यातून खाली उड्या मारत जीव वाचवला. ही घटना घडल्याच्या अगदी काही तासांत आज (ता. 16 नोव्हेंबर) पुन्हा सकाळी इटावाजवळ दिल्लीहून सहरसाकडे जाणाऱ्या वैशाली ट्रेनच्या एस-6 बोगीला आग लागली. या घटनेत 19 प्रवासी जखमी झाले असून यांतील 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. (Two incidents of burning trains in Uttar Pradesh in 24 hours)
हेही वाचा – मुंबई विमानतळाने केला रेकॉर्ड; वीकेंडला विक्रमी 1032 उड्डाणे
मिळालेल्या माहितीनुसार, इटावाजवळ दिल्लीहून सहरसाकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 12554 वैशाली ट्रेनच्या एस-6 कोचच्या बाथरूममध्ये आग लागली. इटावाजवळील पोलीस स्टेशनच्या फ्रेंड्स कॉलनी परिसरातील मैनपुरी गेटच्या बाहेरील बाजूस हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, धावत्या रेल्वेमध्ये ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सदर घटना उघडकीसल येताच मोटरमनने प्रसंगावधान राखत ट्रेन थांबवली. यानंतर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. तासाभराहून अधिक वेळ गाडी थांबवल्यानंतर ती सोडण्यात आली. परंतु, या घटनेत 19 जण जखमी झाले आहेत. यांतील 11 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सैफई वैद्यकीय महाविद्यालयात सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर 8 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तर धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशात दोन बर्निंग ट्रेनच्या घटना घडलया आहेत. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल बुधवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास देखील ट्रेन क्रमांक 02570 नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. ज्यावेळी काल ट्रेनला आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी ट्रेनचा वेग हा 20 ते 30 किमी प्रति तास होता असे सांगण्यात येत आहे. छठच्या सणासाठी अनेक लोक सध्या गावी जात असल्याने यावेळी या ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी होती. त्यामुळे ही घटना घडताच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या घेतल्या. या घटनेत 8 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेमुळे काल कानपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन बंद करण्यात आली होती. परंतु, गेल्या 24 तासांमध्ये ट्रेनला आग लागण्याच्या दोन दुर्घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत.