अमेरिकेतील विमानतळावर दोन विमानांची टक्कर, एफएएकडून तपास सुरू

नवी दिल्ली : अमेरिकेतील बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायटेड एअरलाईन्सच्या दोन विमानांची टक्कर झाली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजते. बोस्टन लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करण्यासाठी सज्ज असलेली दोन युनायटेड एअरलाईन्सची उड्डाणे काल, सोमवारी सकाळी 8:30 वा. (स्थानिक वेळेनुसार) एकमेकांना धडकल्याचे वृत्त सीएनएनने फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) चा हवाला देऊन सांगितले.

अमेरिकेच्या बोस्टन लोगान या आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायटेड एअरलाईन्स विमान 515 च्या उजव्या विंगने सकाळी 8:30 च्या (स्थानिक वेळेनुसार) सुमारास युनायटेड एअरलाईन्स विमान 267 च्या मागील बाजूस टक्कल दिल्याचे एफएएने आपल्या निवेदनात सांगितले आहे. या दोन्ही विमानांची टक्कर झाल्यनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही विमाने बोईंग ७३७ या रनवेवरून निघणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे.

विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही विमानामधील प्रवाशांना सोमवारी दुपारच्या नियोजित इतर विमानांमध्ये पुन्हा बसवण्यात आले. परंतु या अपघाताविषयी प्रवाशांना विचारले असता त्यांनी ही घटना थोडी धक्कादायक असल्याचे सांगितले. मार्टिन न्युश या प्रवाशाने सांगितले की, हा आमच्याासाठी एक मोठा धक्का होता. जेव्हा आम्ही विमानात होतो तेव्हा विमानाचे पंख टक्कर मारल्यानंतर कापले गेले आणि दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना चिकटले असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, निकोलस लिऑन या आणखी एका प्रवाशाने सांगितले की, विमानांची टक्कर झाल्यामुळे त्याला अचानक धक्का बसला, कारण उभ्या असलेल्या विमानाला अपघात झाल्याचे त्याला उजवीकडील बाजूच्या खिडकीतून दिसले. अपघातानंतर फायर इंजिन आणि पोलिसांच्या गाड्या पाहून आम्ही थोडे घाबरलो आणि विमानातील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्वजण विमानातून पटकन खाली उतरलो, असे लिओन याने सांगितले.

गेल्या वर्षीही दोन विमानांची टक्कर
अमेरिकेतील डलास येथे १३ नोव्हेंबर २०२२ रोजी एका एअर शोदरम्यान दुसऱया महायुद्धात वापरण्यात आलेल्या दोन विमानांची टक्कर झाली होती. ही दोन्ही विमाने दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली. या टक्करनंतर विमाने खाली कोसळताच त्यांचा मोठा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत दोन्ही विमानांमधील सहाही जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना स्थानिक प्रमाणवेळेनुसार शनिवारी दुपारी 1.20 वाजण्याच्या सुमारास घडली होती.