घरदेश-विदेशकाश्मिरमध्ये लागोपाठ दहशतवादी हल्ले; पुलवामामध्ये दोन पोलीस शहीद

काश्मिरमध्ये लागोपाठ दहशतवादी हल्ले; पुलवामामध्ये दोन पोलीस शहीद

Subscribe

जम्मू- काश्मीरमध्ये आज सकाळी दोन दहशतवादी हल्ले झाले. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात १० जवान जखमी झाले. तर दुसरीकडे पुलवामामध्ये काश्मीर पोलिसांच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले. पोलिसांनी देखील या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. हल्ला करुन दहशतवादी फरार झाले. सध्या पोलिसांकडून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून शोधमोहीम सुरु आहे. रमजान सुरु असल्याने सरकारने सीमाभागात सर्च ऑपरेशनला बंदी घातली आहे. या बंदीनंतर लागोपाठ सीमेवर घुसखोरी सुरु असून दहशतवादी हल्ले वाढले आहेत.

पुलवामामध्ये कोर्ट परिसरातच धुमश्चक्री

दहशतवाद्यांनी मंगळवारी पुलवामाच्या कोर्ट परिसरातील पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस शहीद झाले. तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलिसांवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी दहशतवाद्यांवर गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -

सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला

अनंतनागच्या जंगलात पेट्रोलिंगवर निघालेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे १० जवान जखमी झाले. या जवानांवर सध्या हॉस्पिलमध्ये उपचार सुरु असून सर्व जणांची प्रकृती स्थिर आहे. ग्रेनेड हल्ला करुन दहशतवादी पळून गेले. जवानांकडून शोधमोहिम सुरु आहे.

दोन दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टर येथे ११ जूनला दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. रविवारी जवानांची रायफल दहशतवाद्यांनी हिसकावून नेली होती. तपासादरम्यान या दहशतवाद्यांकडे ही रायफल सापडली. राजौरी पोलीस आणि सीआरपीएफ जवान राजौरी-डीकेजे मार्गावर संयुक्तरित्या वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, बाईकवरुन जाणाऱ्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अडवले. मात्र, या दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळीबार गेला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली.

- Advertisement -

गृहमंत्र्यांनी केला सीमाभागाचा दौरा

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ७ जूनला सीमा भागाचा दौरा केला होता. यावेळी सीमाभागात रहाणाऱ्या स्थानिकांची त्यांनी भेट घेतली. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह यांच्या सोबत होत्या.

गेल्या ४ वर्षांच्या कार्यकाळात जवानांना ६१९ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. मागच्या सरकारच्या काळात हा आकडा ४७१ होता. तर दहशतवादी हल्ल्यात जवान आणि नागरिकांच्या मृत्यूची संख्या १९९७ पेक्षा २०१७ मध्ये ९६ टक्क्यांनी कमी झाली आहे.
राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

 

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -