सर्जिकल स्ट्राइक : दिग्विजय सिंह यांच्याकडून सारवासारव तर, काँग्रेसचे कानावर हात

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राईकबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. त्याबाबत काँग्रेस पक्षाने कानावर हात ठेवले तर, दिग्विजय सिंह यांनी सारवासारवही केली.

भारत जोडो यात्रा सोमवारी जम्मूमध्ये पोहोचली. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले. भाजपवाले सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलतात, पण आतापर्यंत एकही पुरावा देण्यात आलेला नाही. भाजपा खोट्याचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्जिकल स्ट्राईकमध्ये आम्ही अनेक लोक मारले, असे केंद्र सरकारने म्हटले आहे, पण याचा कोणताही पुरावा दिला नाही. या सर्जिकल स्ट्राइकबद्दलची माहिती ना संसदेत मांडली गेली ना जाहीर केली गेली, असे दिग्विजय सिंह म्हणाले होते. पण आता त्यांनी घुमजाव केले असून मी भारतीय जवानांचा आदर करतो, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितल्याने काँग्रेसची स्थिती अवघड झाली आहे. भाजपाने यावरून काँग्रेसविरुद्ध हल्लाबोल सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यापासून हात झटकले. ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलेले विचार हे काँग्रेस पक्षाचे नसून त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, 2014 पूर्वी यूपीए सरकारनेही सर्जिकल स्ट्राईक केले होते. काँग्रेसने राष्ट्रीय हितासाठी सर्व लष्करी कारवाईला पाठिंबा दिला आहे आणि पाठिंबा देईल, असे जयराम रमेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

जम्मूमध्ये रॅली संपल्यानंतर पत्रकारांनी दिग्विजय सिंह यांना पुन्हा सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्न विचारला. यादरम्यान पत्रकारांचे माईक दूर करून दिग्विजय सिंह यांना यावर उत्तर देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. तरीही दिग्विजय एवढेच म्हणाले की, सुरक्षा दलांबद्दल आम्हाला खूप आदर आहे आणि त्यांना सर्वोच्च स्थान देतो.

जयराम रमेश यांचा संताप
दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. याबाबत जयराम रमेश यांना विचारले असता, त्यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, याबाबत मी कालच ट्वीट केले आहे. याबाबत पक्षाची भूमिका काय आहे, हे मी त्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मी यावर काहीही बोलणार नाही. तुम्ही जाऊन पंतप्रधानांना प्रश्न विचारा, असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला.