भारतीय लोकांच्या मुस्लिमविरोधी पोस्टवरुन युएई नाराज; राजकुमारीने दिला इशारा

युएईच्या राजकन्या हेंद अल कासिमी यांनी भारतीय वापरकर्त्याची मुस्लिमविरोधी पोस्टचे स्क्रीनशॉट्स शेअर करताना लिहिलं की, "मुस्लिमविरोध आणि जातीयवादी करणाऱ्यांवर कठोर दंड ठोठावला जाईल आणि त्यांना युएईमधून हद्दपार केलं जाईल.

uae

कोरोना विषाणूच्या लढाईत जेव्हा भारताने गेम चेंजर औषध मानलं जाणारं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन युएईमध्ये पाठवलं तेव्हा त्यांनी खुलेपणाने भारताचे कौतुक केलं. मात्र, गेल्या काही दिवसांत अशा घटना पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे भारत-युएई संबंधांमधील मतभेद वाढत आहेत. भारतात कोरोना विषाणूवरुन मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे. यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) संताप व्यक्त केला जात आहे.
युएईमध्ये सोशल मीडियावर काही भारतीय मुस्लिम समुदायाविरूद्ध द्वेष पसरवणाऱ्या काही पोस्टवरुन राग व्यक्त केला जात आहे. सुप्रसिद्ध भारतीय गायक सोनू निगमही या संपूर्ण वादात अडकला आहे. तो सध्या दुबईमध्ये आहे आणि आपल्या जुन्या ट्वीटमुळे तो पुन्हा निशान्यावर आला आहे. सोनू निगमने काही वर्षांपूर्वी मुंबईत लाऊडस्पीकरवर अजान घेण्यावर आक्षेप घेतला होता.

मार्चच्या सुरूवातीलाच नवी दिल्ली येथे तबलीगी जमातचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाग घेतलेल्या बर्‍याच लोकांच्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावरील काही पोस्ट्स करत संपूर्ण मुस्लिम समाजाला याबाबत जबाबदार धरलं गेलं. यावर टीका करीत इस्लामिक सहकार संघटनेनेही एक निवेदन जारी करत या गोष्टी भारतात थांबवल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. इतकेच नव्हे तर तीन दिवसांपूर्वी युएईच्या राजकन्याने अनिवासी भारतीयांना कडक इशारा दिला. युएईच्या राजकन्या हेंद अल कासिमी यांनी भारतीय वापरकर्त्याची मुस्लिमविरोधी पोस्टचे स्क्रीनशॉट्स शेअर करताना लिहिलं की, “मुस्लिमविरोध आणि जातीयवादी करणाऱ्यांवर कठोर दंड ठोठावला जाईल आणि त्यांना युएईमधून हद्दपार केलं जाईल.” या इशाऱ्यानंतर भारतीय वापरकर्त्याने त्याचे ट्विटर अकाउंट डिलीट केलं. युएईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात आणि त्यांचे भारताशी चांगले संबंध आहेत. काश्मीरची विशेष दर्जा जेव्हा भारताने रद्द केला होता, तेव्हा युएईने इस्लामिक देश असूनही म्हटलं की ही भारताची अंतर्गत बाब आहे. युएई राजकन्या म्हणाली की युएईचे राजघराणे हे भारतीयांचे मित्र आहेत, परंतु अशी वृत्ती मान्य नाही. येथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला कामाच्या बदल्यात पैसे मिळतात, कोणीही येथे विनामूल्य काम करण्यासाठी येत नाही. आपण या देशात राहून आपली उपजीविका चालवत आहात, जर आपण त्याची चेष्टा केली तर मग कोणीही त्याकडे लक्ष देणार नाही असा विचार करू नका.


हेही वाचा – रॅपीड टेस्ट किटमध्ये उणिवा; दोन दिवस चाचणी किट वापरू नका – ICMR


राजकुमारीच्या ट्विटनंतर भाजप नेते तेजस्वी सूर्या यांचे जुने ट्विट युएईच्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. २०१५ मध्ये तेजस्वीने एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे की गेल्या २०० वर्षांत ९५ टक्के अरब महिलांनी कधीच ऑर्गेज्म अनुभवला नाही. अरब स्त्रिया फक्त प्रेमाशिवाय लैंगिक संबंधांनी मुले निर्माण करतात. तेजस्वी यांनी केलेल्या या जुन्या ट्विटमुळे युएईच्या नागरिकांना आणखी राग आला.

या ट्वीटचा स्क्रीनशॉट सामायिक करताना कुवैतचे वकिल शरीका यांनी लिहिलं आहे की, भारतीय नेत्याने अरब महिलांबद्दल वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह भाष्य केले होते ज्यामुळे अरब लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तेजस्वीविरोधात भारत सरकारकडून कारवाई करण्याची मागणी केली. वाद वाढताच तेजस्वी यांनी हे ट्विट हटवलं. कुवेतचे वकील शारिका यांनी लिहिलं आहे की, भारत हा प्रचंड लोकसंख्या असलेला एक प्राचीन देश आहे आणि लोक शतकानुशतके धार्मिक आणि वांशिक भेदभावाशिवाय शांततेत राहत आहेत. विविध धर्मांचा देश म्हणून भारत देशाला ओळखतात, कृपया भारताची ही सुंदर प्रतिमा खराब करू नका.

या तणावपूर्ण विकासादरम्यान भारतीय राजदूत यांनी सोमवारी तेथे राहणाऱ्या भारतीयांनाही सतर्क केले आहे. युएईमध्ये भारतीय राजदूत पवन कपूर म्हणाले की, “भारतीयांनी कोणत्याही धर्माला दुखावणारी पोस्ट् करू नये. कोणताही धार्मिक भेदभाव सहन केला जाणार नाही. भारत आणि युएईमध्ये धर्माच्या आधारे किंवा अन्य कोणत्याही आधारे भेदभाव करण्याचे कोणतेही धोरण राहिलेलं नाही. हे आपल्या कायदा आणि सुव्यवस्था या दोघांच्या विरोधात आहे. युएईमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.”