जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रप्रमुख शेख खलिफांचा मृत्यू

शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी 4 नोव्हेंबर 2004 पासून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून काम केले. शेख खलिफा हे त्यांचे वडील दिवंगत शेख झायेद बिन सुलतान अल नाह्यान यांच्या नंतर सत्तेवर आले.

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षीय व्यवहार मंत्रालयाने राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून ४० दिवसांचा शोक जाहीर केला आहे. याशिवाय सर्व मंत्रालये आणि खाजगी क्षेत्रातील काम तीन दिवस बंद राहणार आहे.

शेख खलिफा यांच्या निधनाबद्दल यूएई, अरब, इस्लामिक राष्ट्र आणि जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी 4 नोव्हेंबर 2004 पासून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून काम केले. शेख खलिफा हे त्यांचे वडील दिवंगत शेख झायेद बिन सुलतान अल नाह्यान यांच्या नंतर सत्तेवर आले.  शेख झायेद यांनी 1971 मध्ये अमिरात अस्तित्वात आल्यानंतर 2 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत युएईचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे युएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीच्या अमिरातीचे 16 वे शासक होते. शेख झायेद यांचा तो मोठा मुलगा होता. युएईचे अध्यक्ष झाल्यानंतर, शेख खलिफा यांनी फेडरल सरकार आणि अबू धाबी सरकारच्या पुनर्रचनेत मोठी भूमिका बजावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मोदी म्हणाले, महामहिम शेख खलिफा बिन झायेद यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले. ते एक महान आणि दूरदर्शी नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-यूएई संबंध अधिक समृद्ध झाले. भारतातील लोकांच्या संवेदना यूएईच्या लोकांसोबत आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या कुटुंबियांशी आणि युएईमधील लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. युएईमध्ये झपाट्याने वाढलेले दूरदर्शी नेते म्हणून ते स्मरणात राहतील.

शेख खलिफा हे जगातील सर्वांत श्रीमंत राष्ट्रप्रमुख होते. त्यांची एकूण वैयक्तिक संपत्ती 1 हजार 286 अब्ज रुपये आहे.  त्यांनी आपल्या संपत्तीतील मोठा भाग शिक्षण आणि आरोग्यासाठी दान केला आहे.  काही दिवसांपूर्वीच त्यांनी अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीतील कॅन्सर डिपार्टमेंटसाठी 1 हजार 65 कोटी रुपयांची देणगी दिली होती. खलिफांकडे 593 फूट लांबीची यॉट  होती. या बोटीची किंमत 4 कोटी रुपये आहे. ही यॉट पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे. दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’चे नावही त्यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. शेख खलिफा राहत असलेल्या ‘कसर अल वतन’ नावाच्या  महालाची किंमत 3 हजार 553 कोटी रुपये आहे.