घरताज्या घडामोडीभाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंना उमेदवारी!

भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंना उमेदवारी!

Subscribe

भाजपने राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रामधून दोन जागांची घोषणा केली असून त्यासाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या उमेदवारीवरून बरीच चर्चा सुरू होती, त्या उमेदवारीचा निर्णय अखेर भाजपकडून घेण्यात आला आहे. पक्षाकडून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले आणि नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपत आलेले साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासोबतच सहयोगी सदस्य म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या तिकिटावर राज्यसभेची उमेदवारी मिळवण्याचा दावा करणाऱ्या संजय काकडेंना या निर्णयामुळे धक्का बसला आहे. मध्यंतरी त्यांनी उदयनराजे भोसलेंवर राज्यसभेच्या उमेदवारीवरून जोरदार टीका देखील केली होती.

११ जागांच्या उमेदवारांची घोषणा

भाजपकडून राज्यसभेच्या एकूण ११ जागांच्या उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये महाराष्ट्रातून भाजपच्या तिकिटावर उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्ष म्हणून रामदास आठवलेंच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय, नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे मध्य प्रदेशमधील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

उमेदवारांची यादी

महाराष्ट्र – उदयनराजे भोसले
मध्य प्रदेश – ज्योतिरादित्य शिंदे
आसाम – भुवनेश्वर कालीता
बिहार – विवेक ठाकूर
गुजरात – रमीलाबेन बारा
झारखंड – दीपक प्रकाश
मणिपूर – लिएसेंबा महाराजा
राजस्थान – राजेंद्र गेहलोत

सहयोगी सदस्य पक्ष

महाराष्ट्र – रिपाइं – रामदास आठवले
आसाम – बीपीएफ – बुस्वजीत डाईमरी

- Advertisement -

आता संजय काकडे काय करणार?

दरम्यान, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यास राज्यसभेमध्ये पुनर्वसन करण्यात येईल, असं आश्वासन भाजपने उदयनराजे भोसलेंना दिलं होतं, या चर्चेला राज्यसभेतल्या उमेदवारीने बळ मिळालं आहे. तर दुसरीकडे, संजय काकडे आता काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि पराभूत झाले, उदयनराजे भोसलेंनी असं पक्षासाठी काय केलं आहे? मला पक्षाकडून उमेदवारी मिळणार!’, असं काही दिवसांपूर्वी संजय काकडेंनी छातीठोकपणे सांगितलं होतं.


वाचा सविस्तर – ‘उदयनराजेंनी असं केलं काय?’ संजय काकडेंचा सवाल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -