UK : भारताचा आक्रमक पवित्रा, यूके प्रवासात क्वारंटाईनची १० दिवसांची अट शिथील

Uk quarantine period relaxed

भारतीय प्रवाशांसाठी युनायटेड किंगडम येथे प्रवासासाठी क्वारंटाईनच्या नियमाच्या सक्तीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये वाद निर्माण झाला होता. भारतानेही त्याच पद्धतीने चोख उत्तर देत अशाच प्रकारची नियमावली युकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी जाहीर केली होती. पण युकेने एकुणच भारतासाठी नमते धोरण घेत या क्वारंटाईनच्या अटीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय़ घेतला आहे. युकेने कोरोनाचा संसर्ग असणाऱ्या देशांची रेड कॅटेगरी केली होती. त्यामध्ये भारताचाही समावेश होता. पण भारताच्या आक्रमक पवित्र्यापुढे युकेला नमते धोरण स्विकारावे लागले आहे. (UK relaxed quarantine 10 days period for indian travelers)


युनायटेड किंगडम (UK) येथे प्रवास करणाऱ्या भारतीयांना यापुढेच १० दिवस सक्तीची अट आता शिथील करण्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबरपासून ही अट शिथील करण्यात येत असल्याची माहिती युकेकडून देण्यात आली आहे. ब्रिटिश हाय कमिश्नर एलेक्स एल्लिस यांनी ही माहिती गुरूवारी दिली आहे. युकेमध्ये लॅण्डिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारीत नियमावली जाहीर करत ही माहिती देण्यात आली आहे. जगभरात covid-19 परिस्थितीचा आढावा घेऊनच युकेच्या आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हे सुधारीत जाहीर केले आहे.

येत्या ११ ऑक्टोबरपासून ज्या भारतीयांनी कोविशिल्ड किंवा युकेने मंजुर केलेली लस घेत लसीकरण पुर्ण केले असेल अशा भारतीयांना क्वारंटाईन करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सरकारने केलेल्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. एलेक्स एल्लीस यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून भारत सरकारचे आभार मानले आहेत.

भारतीय परराष्ट्र खात्याने प्रवक्त अरिंदम बाग्ची यांनी युकेमध्ये प्रवासासाठी लादलेल्या अटी अतिशय अन्यायकारी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भारतानेही युकेतून भारतात येणाऱ्यांसाठी १० दिवसांची क्वारंटाईनची अट घातली. ४ ऑक्टोबरपासून ही अट लागू झाली आहे. त्यानंतरच युके आणि भारत सरकार यांच्यात क्वारंटाईनच्या विषयावर चर्चेला सुरूवात झाली. त्यामध्ये लसीकरणाचे प्रमाणपत्र हादेखील महत्वाचा मुद्दा होता.

युकेमध्ये नवीन नियमावली ही येत्या ११ ऑक्टोबरपासून अंमलात येणार आहे. त्यामध्ये भारतासह एकुण सात देशांचा समावेश आहे. युकेतील अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने तसेच व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय युके सरकारने घेतला आहे. लसीकरण पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असलेल्या ३७ देशातील नागरिकांनाही युकेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामध्ये भारतासह, पाकिस्तान, टर्की, दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.