मागील एक वर्षापासून युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. अद्यापही हे युद्ध संपलेले नाही. रशियाने युक्रेनच्या एका धरणावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे अनेक गावं जलमय झाली आहेत. तर काही जण बेपत्ता झाले आहेत. मंगळवारी पहाटे, दक्षिण युक्रेनमध्ये असलेल्या नोव्हा काखोव्का धरणात मोठा स्फोट झाला आणि याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
हे युक्रेनमधील सर्वात मोठे धरण आहे. रशिया आणि युक्रेन या हल्ल्याची जबाबदारी एकमेकांवर लोटत आहेत. धरणावरील हल्ल्यानंतर युद्धभूमीपर्यंत पाणी पोहोचले आहे. यावेळी २४ गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून लगतची गावं खाली करण्यात आली आहेत. युक्रेनचे उप परराष्ट्रमंत्री एमिन झापरोवा यांनी याबाबत काही फोटो जारी केले आहेत. रशियातील सैनिकांनी युक्रेनच्या सर्वात मोठ्या धरणावर हल्ला केला आहे. त्यामुळे देशात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
नोव्हा काखोव्का धरण युक्रेनमधील सर्वात मोठ्या नीपर नदीवर बांधले आहे आणि ते खेरसन शहराच्या पूर्वेस ३० किमी अंतरावर आहे. हे धरण फुटणे स्थानिक क्षेत्रासाठी विनाशकारी ठरेल तसेच युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांवर परिणाम करेल. हे धरण ३० किलोमीटर लांब आणि शेकडो मीटर रुंद आहे. हे १९५६ मध्ये काखोव्का जलविद्युत प्रकल्पांतर्गत बांधले गेले. या धरणात सुमारे १८ घन किलोमीटर पाणीसाठा असल्याचे सांगण्यात येते. हे पाणी अमेरिकेतील उटाह येथील ग्रेट सॉल्ट लेकमधील पाण्याइतके आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर आपत्कालीन बैठक बोलावली. काखोव्का धरणावर रशियाने हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले. दुसरीकडे धरण असलेले क्षेत्र आमच्या ताब्यात असताना आम्ही हल्ला करायला मुर्ख आहोत काय, असा सवाल उपस्थित करून युक्रेननेच हे धरण उद्ध्वस्त केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला. दरम्यान, युक्रेनच्या अंदाजानुसार, जवळपास १०० गावं आणि कस्बोमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या पाच ते सात दिवसांमध्ये पाण्याची पातळी कमी होईल, असा अंदाज युक्रेनकडून लावण्यात येत आहे.
हेही वाचा : रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रात ठराव मंजूर, भारतासह 32 देश राहिले दूर