कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर आज, शनिवारी (11 जानेवारी) बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत असून आतापर्यंत 23 कामगारांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आले आहे. तसेच उर्वरीत कामगारांना बाहेर काढण्यात येईल, अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Under-construction building collapses at Kannauj railway station in Uttar Pradesh)
कन्नौज रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुशोभीकरणाचे काम सुरू होते. आज दुपारी सुमारे 3 च्या सुमारास इमारत कोसळताच संपूर्ण परिसरात मोठा आवाज झाला. इमारतीच्या कमानीसाठी तयार केलेली साहित्याची पहिली ट्रॉली वर जाताच संपूर्ण बीम खाली कोसळले. 40 ते 50 कामगार त्याठिकाणी काम करत होते, ते सर्वजण बीमखाली गाडले गेले. यातील 23 जणांना वाचवण्यात आले असून 20 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या तीन कामगारांना लखनऊ येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री असीमी अरुण यांनी दिली. तसेच या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आणि त्यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.
#WATCH | Kannauj, Uttar Pradesh: Rescue operation underway after an under-construction lintel collapsed at Kannauj railway station
As per state minister Asim Arun, 23 people have been rescued, 20 people received minor injuries and are undergoing treatment. 3 people are seriously… pic.twitter.com/Y3GshpeuTf
— ANI (@ANI) January 11, 2025
घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
दरम्यान, कन्नौज रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तपास पथकात मुख्य अभियंता (नियोजन आणि डिझाइन), अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक इज्जतनगर आणि रेल्वे संरक्षण दलाचे मुख्य सुरक्षा आयुक्त यांचा समावेश असेल. याशिवाय, या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या सानुग्रह अनुदानात वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत, किरकोळ जखमींना पन्नास हजार रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाख पन्नास हजार रुपये भरपाई म्हणून देण्यात आली आहे.