राहुल गांधींनी साधला अर्थसंकल्पावर निशाणा, म्हणाले…

या अर्थसंकल्पात भारताचे भविष्य घडविणारा कोणताच रोडमॅप नाही. कारण १% श्रीमंतांकडे ४०% संपत्ती आहे. ५०% गरीब जीएसटी भरतात. ४२% तरुण बेरोजगार आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची काहीच चिंता नाही, असा टीका राहुल गांधी यांनी व्टिटमध्ये केली आहे.

rahul gandhi

Union Budget 2023 : नवी दिल्ली – भाजप सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘मित्रकाळ’ अर्थसंकल्प आहे, अशी टीका कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी ट्विट करुन अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. या अर्थसंकल्पात नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट नाही. महागाई निवारणासाठी योजना नाही. विषमतेवर तोडगा नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात भारताचे भविष्य घडविणारा कोणताच रोडमॅप नाही. कारण १% श्रीमंतांकडे ४०% संपत्ती आहे. ५०% गरीब जीएसटी भरतात. ४२% तरुण बेरोजगार आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची काहीच चिंता नाही, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लगावला आहे.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, येत्या काही काळात काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बेरोजगारी, गरिबी याविषयी अर्थसंकल्पात अपेक्षित तरतुद करण्यात आलेली नाही.

कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही ट्विट करून अर्थसंकल्पावर टीका केली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, शिक्षण, मनरेगा व अनुसुचित जातीच्या कल्याणसाठी भरघोस तरतुद करण्यात आली होती. या संबंधी योजनांवर खर्च मात्र पुरेसा झालेला नाही.

कॉंग्रेस नेता के.सी. वेणुगोपाल म्हणाले, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झालेला नाही. विमा कंपन्यांना या योजनेचा लाभ झाला. तसेच हा अर्थसंकल्प बेरोजगारी व महागाई निवारणाला न्याय देणारा नाही.

कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली असली तरी काही नेत्यांनी भाजपच्या अर्थसंकल्पाचे कौतुकही केले आहे. कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले, अर्थसंकल्पात काही चांगल्या गोष्टी आहेत. पण मनरेगा, ग्रामीण मजूर, रोजगार व महागाई यावर अधिक भाष्य अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही. काही मूलभूत प्रश्न अनुत्तरीच राहिले.

कॉंग्रेसचे खासदार कीर्ती चिदंबरम म्हणाले, लोकांच्या हातात पैसा ठेवणे हा अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे कोणत्याही कर कपातीचे मी स्वागतच करतो.