देशभरात ऑक्टोबरपासून 5G सेवा होणार सुरू, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

संपूर्ण देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार आहे, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा पोहोचणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वांना परवडेल अशा माफक दरात ही सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागावर लक्ष देण्यास दूरसंचार कंपन्यांना सांगण्यात आले आहे. 5G सेवा सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल याची काळजी घेणार आहोत, असंही वैष्णव म्हणाले.

12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

देशभरातील 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

5G स्पेक्ट्रम सेवा देण्यासाठी अलिकडेच दूरसंचार कंपन्यांना सरकारकडून स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले होते. ज्या दिवशी निविदादार कंपन्यांनी निविदा जिंकली होती. त्याच दिवशी संबंधित कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटपाचे पत्र देण्यात आले होते.


हेही वाचा : कोरोनाच्या महामारीत फसलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा शटडाऊन, कशामुळे ते वाचा…