Coal Shortage: देशातील अतिवृष्टीमुळे कोळशाचा तुटवडा, केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Union Minister of Coal Pralhad Joshi told coal shortage due to rain and price hike
Coal Shortage: देशातील अतिवृष्टीमुळे कोळशाचा तुटवडा, केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

देशातील काही राज्यांमध्ये कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे देशात चर्चांना उधाण आलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु आहेत. अशातच केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोळशाचा तुटवडा होण्यामागचे कारण सांगितलं आहे. देशात अतिवृष्टी झाल्यामुळे कोळशाचा तुटवडा झाला असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर वाढले असल्यामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली असल्याचे केंद्रीय मंत्री जोशी यांनी सांगितले आहे. येत्या १५ ते २० दिवसांमध्ये कोळशाचा तुटवडा दूर होईल असा विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशातील कोळसा तुटवड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जोशी यांनी म्हटलं आहे की, देशात अतिवृष्टी झाल्यामुळे कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किंमतीमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे आयातीवर परिणाम झाला. यामुळे आयात करण्यात येणाऱ्या कोळशावर अवलंबून असलेले वीजनिर्मीती संच बंद तसेच कमी वीजेची निर्मिती करत आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

दरम्यान आतापर्यतच्या इतिहासात सर्वाधिक कोळशाची आयात करण्यात आली असून सोमवारी १.९४ मिलियन टन कोळसा सप्लाय करण्यात आला आहे. पहिले १५ ते २० दिवसांचे कोळाशाचा साठा होता तो आता कमी झाला आहे परंतु सोमवारी कोळशाचा साठा वाढवण्यात आला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये कोळशाचा साठा आणखी वाढवण्यात येणार असून चिंता करण्याचे कारण नाही असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.

अतिवृष्टीमुळे कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ६० रुपये प्रति टन अशी किंमत १९० रुपये टन ऐवढी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी कोळशाच्या मुद्द्यावर उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित शाह यांनी देशातील कोळशाच्या साठ्याचा आणि आयातीबाबतचा आढावा घेतला आहे. यावेळी कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी)चे अधिकारी आणि ऊर्जामंत्री आरके सिंह उपस्थित होते.


हेही वाचा : सणासुदीच्या दिवसात जनतेनं विजेची काटकसर करावी – उर्जामंत्री नितीन राऊत