भोपाळ : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल मंगळवारी मध्य प्रदेशातील एका अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांच्या गाड्यांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपुरा येथे जात असताना अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथे दुचाकीस्वाराला वाचवताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रल्हाद पटेल यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येते.
VIDEO | Those injured in the accident were rushed to a nearby hospital. Union minister Prahlad Patel also suffered minor injuries after his car met with accident in Chhindwara earlier today. pic.twitter.com/5xbaVMzEew
— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2023
मध्य प्रदेशात येत्या 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल हे भाजपाच्या तिकिटावर यावेळी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नरसिंगपूरमधून ते निवडणूक लढवत आहेत असून ते रात्रंदिवस प्रचारात मग्न आहेत. छिंदवाडा येथून पदयात्रा केल्यानंतर केंद्रीय मंत्री पटेल यांचा ताफा नरसिंगपूरच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान सिंगोडी बायपास येथे समोरून चुकीच्या मार्गिेकेतून येणाऱ्या बाईकशी त्यांच्या गाडीची टक्कर झाली. ही धडक एवढी जोरदार होती की, गाडीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातानंतर त्यांची कार रस्त्यावरून खाली उतरली.
हेही वाचा – …तर समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला का केला? गडकरींसह एकनाथ शिंदेंना खासदाराचा सवाल
एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला. मंत्री प्रल्हाद पटेल यांच्यासह बरोबरच्या इतरांनी या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. निरंजन चंद्रवंशी या 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून तो पेशाने शिक्षक होता. शाळा सुटल्यानंतर सोबत तीन मुलांना घेऊन तो घरी जात होता. जखमींना नागपूर मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आले आहे, असे छिंदवाडाचे एसडीएम सुधीर जैन यांनी सांगितले.