lakhimpur violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी आशिष मिश्राला अटक

Union minister's son ashish mishra in judicial custody over Lakhimpur incident; court to hear matter today
lakhimpur violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी आशिष मिश्राला अटक

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा याची एसआयटीच्या पथकाकडून सुमारे ११ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य न करता अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावात भरधाव वाहन घुसवून केल्या हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्राविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आशिष मिश्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजर झाला होता. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील सुमारे नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची जवळपास ११ तास सखोल चौकशी केली. यावेळी त्याला तीन डझनहून अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत. यानंतर त्याला आता न्यायालयात हजर केले जाईल असे उत्तर प्रदेशचे डीआयजी उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले.

आरोपी आशिष मिश्राला अटक करण्यात आल्याच्या माहितीला राज्य पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाचे प्रमुख उपेंद्र अगरवाल यांनी दुजोरा दिला आहे. आरोपी आशिषच्या अटकेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया देत सांगितले की, १२ तारखेला आम्ही बैठकीचे आयोजन केले आहे. परंतु ते आधी तुरुंगात जाऊ दे. त्यानंतर ते कोणत्या विभागात पाठवत आहेत ते पाहू. १५ तारखेला पुतळा जाळला जातो. त्यांच्या वडीलांचे अर्थात संजय मिश्रा यांचे प्रकरण आहे. त्यांना निलंबित का केले जात नाही? असा सवाल उपस्थित केला.

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटार घुसवून हिंसाचार घडवण्यात आला होता. या हिंसाचारात मोटारीखाली चिरडून शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेनंतर गुन्ह्यातील आरोपी आशिष मिश्रा ३ ऑक्टोबरपासून फरार होता. या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली. तसेच सर्वच विरोधी पक्षांनी आणि देशातील शेतकरी संघटनांनी आरोपी आशिषच्या अटकेची मागणी केली होती. याशिवाय महाराष्ट्रात या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेत्यांनी सोमवारी महाराष्ट बंदची हाक दिली आहे. तर देशातील शेतकरी संघटनांनीही या निषेधार्थ रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.