अविवाहित लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा सर्वाधिक धोका; नव्या संशोधनामुळे खळबळ

Unmarried men at higher death risk
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना महामारी आल्यापासून नवनवीन संशोधने रोज समोर येत असतात. कोरोनामुळे होणारे मृत्यू हे अतिशय कमी असल्याचे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. मात्र तरिही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे भय कमी झालेले नाही. एका नव्या संशोधनानुसार अविवाहित लोकांची झोप उडू शकते. कमी उत्पन्न, कमी शिक्षण, अविवाहीत असणे आणि विकसनशील देशात जन्माला आलेल्या लोकांना कोरोनाच्या मृत्यचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम विद्यापीठातील तज्ज्ञ स्वेन ड्रेफहल यांनी केलेल्या संशोधनातून हे अनुमान काढण्यात आलेले आहे.

स्टॉकहोम विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार अविवाहित लोकांबरोबरच कमी उत्पन्न, शिक्षणाचा अभाव आणि कमी उत्पन्न असलेल्या देशातील लोकांना कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचा अधिक धोका असतो. हे संशोधन स्वीडनमध्ये झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवर आधारीत असून ते ‘स्वीडीश नॅशनल बोर्ट ऑफ हेल्थ अँड वेल्फेअर’ संस्थेने संशोधन पुर्ण केले आहे.

हे संशोधन करत असताना त्यामध्ये वीस वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांनाच घेतले गेले. ‘जनरल नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झालेले आहे. स्वेन ड्रेफहल सांगितले की, कोरोनाच्या मृत्यूसोबतच इतर आणखी काही घटना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांनी संशोधनात नमूद केल्यानुसार, अविवाहीत पुरुष किंवा महिलांमध्ये कोविड १९ मुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका विवाहित लोकांपेक्षा अधिक असतो. तुलनाच करायची झाली तर हे प्रमाण दीड पट अधिक असल्याचे सांगितले जाते. या यादीत अविवाहित लोकांसोबतच विधवा, विधुर आणि घटस्फोटित लोकांचा देखील समावेश आहे.

याच संसोधनात पुढे म्हटले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोविड १९ चा अधिक धोका असतो. याच्याआधी देखील हाच निष्कर्ष अनेक संशोधनातून समोर आला होता. स्वेन ड्रेफहल यांनी मात्र एक हास्यास्पद दावा केला आहे. ते म्हणतात, “काही लोक सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराबाबत त्यांना फार आकर्षण नसते, त्यामुळे अनेक लोक अविवाहीत राहणे पसंत करतात. विवाहीत लोकांच्या तुलनेत अविवाहीत लोकांना असुरक्षित असे वातावरण लाभते. यासाठीच विवाहीत लोकं अविवाहित लोकांपेक्षा कमी आजारी पडतात आणि सुखी व निरोगी जीवनाचा आनंद लुटतात. आमच्या संशोधनातून अविवाहीत लोकांच्या मृत्यूबद्दल आणखी काही तथ्ये दिली आहेत.”

दरम्यान जगभरात आतापर्यंत ३ कोटी ७५ लाख १४ हजार ६६६ लोक कोरोना संक्रमित झालेले आहेत. तर १० लाख ७८ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतात कोरोनामुळे सर्वाधिक हाहाकार उडाला असून तीनही देशांत मृत्यूचा आकडा लाखाहून अधिक आहे.