
देशभरात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन जाणार केला जातो. यानिमित्ताने दिल्ली पोलिसांकडून नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. या नव्या गाईडलाईन्सनुसार, राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामिल होण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होणे आवश्यक आहे. शिवाय १५ वर्षांखालील वयोगटातील मुलांना कार्यक्रमात सामिल होण्याची परवानगी नाही. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, ‘२६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल, जसे की मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे.’
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली पोलीस काय म्हणाले?
- उपस्थितांच्या बैठकीसाठी सकाळी ७ वाजता ब्लॉक खुला केला जाणार
- उपस्थितांनी आपल्याला दिलेल्या आसन स्थानावर बसावे
- कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक
- लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
- १५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी परवानगी नाही
- पार्किंग मर्यादित आहे. त्यामुळे टॅक्सीने कार्यक्रमाला पोहोचावे
- उपस्थितांनी सुरक्षेसंबंधित तपासणी करण्यात सहकार्य करा
- तसेच उपस्थितांनी प्रवेश पाससोबत ओळख पत्र (आधारकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) आणा
- रिमोट कंट्रोल कार लॉक चावी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक पार्किंग एरियामध्ये केली जाईल.
दिल्लीत २७ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात
दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी रविवारी म्हटले आहे की, ‘प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये २७ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. यामध्ये ७१ पोलीस उपायुक्त (DSP), २१३ ACP, ७१३ निरीक्षक, दिल्ली पोलीस कमांडर, सशस्त्र बटालियन अधिकारी आणि सैनिक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि ६५ कंपन्या यात सामिल आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली पोलीस राजधानीमध्ये दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊले उचलत आहेत.