“जातीवर मत मागणारे आपल्या कुटुंबाचे भले करतात”; पंतप्रधान मोदींचा एसपी, आरएलडीवर हल्लाबोल

जातीवर मत मागणारे आपल्या कुटुंबाचे भले करतात; पंतप्रधान मोदींचा एसपी, आरएलडीवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवारी) बिजनौर, मुरादबाद आणि अमरोहा येथील जनतेला ऑनलाईन रॅलीद्वारे संबोधित करत आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी बिजनौरमध्ये रॅली घेणार होते मात्र खराब हवामानामुळे त्यांची ही रॅली रद्द करण्यात आली. मात्र या संबोधनावेळी पंतप्रधान मोदींनी “जातीवर मत मागणारे आपल्या कुटुंबाचे भले करतात” अस म्हणत समाजवादी पार्टी (SP) आणि राष्ट्रीय लोकदल (RLD) पक्षावर हल्लाबोल केला आहे.

“भाजपमध्ये घराणेशाही नाही”

पीएम मोदी म्हणाले की, “भाजपमध्ये घराणेशाही नाही. जेव्हा एखाद्याला पंतप्रधान निवास दिले जाते तेव्हा त्याला त्याची जात विचारली जात नाही. उज्ज्वला योजनेअंतर्गत एखाद्याला सिलिंडर मिळाल्यावर तो कोणत्या समाजाचा आहे, कोणाचा मुलगा आहे हे विचारले जात नाही. असं म्हणत मोदींनी पुढे जातीच्या नावावर मते मागणारे लोक फक्त त्यांच्या कुटुंबाचे भले करतात” असं शब्दात सपा आणि आरएलडी पक्षांवर जहरी टीका केली आहे.

“येत्या २५ वर्षांत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होत आहेत, तेव्हा उत्तर प्रदेशने विकासाची सुवर्णगाथा घेऊन उड्डाण केले पाहिजे, आमचे सरकार सतत या प्रयत्नात गुंतले आहे. गेल्या 5 वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे दिले आहेत. इतके गेल्या दोन सरकारांनी मिळून देखील केले नाही. पूर्वी फक्त बनावट समाजवाद्यांचे वर्चस्व होते” असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

“शेतकऱ्यांना असे दिवस दाखवले ते काय भलं करणार

“चौधरी चरणसिंग यांच्या आदर्शांना अनुसरून सर्व शेतकऱ्यांना सन्मान देणे हे आमचे ध्येय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. यापूर्वी शेतकरी युरियासाठी लाठ्या-काठ्या खात होते, त्यामुळे शेतकऱ्यांना ज्यांनी असे दिवस दाखवले ते शेतकऱ्यांचे कधीही भले करू शकत नाहीत” अशी टीकाही मोदींनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, “पूर्वीच्या सरकारने जेवढा गहू खरेदी केला होता त्यापेक्षा दुप्पट गहू सीएम योगी यांनी त्यांच्याकडून खरेदी करण्यात आला आहे. सीएम योगी यांच्या सरकारने अन्नधान्य खरेदीत दरवर्षी नवे विक्रम नोंदवले. पूर्वी वीजे अभावी तरुणांचे भविष्य पायदळी तुडवले जात होते हे तुम्हाला आठवत असेल. पण आता प्रत्येक गावात वीज येत आहे. पूर्वी हातावर मोजण्या इतके एक्स्प्रेस वे होते पण आज अनेक एक्स्प्रेस वे पूर्ण झाले आहेत” अस म्हणत त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

“गुन्हेगार म्हणत आहेत की, काही झालं तरी जुने माफिया राजवाले सरकार आले पाहिजे,  तर यूपीतून पळून गेलेले गुन्हेगार भाजपचे सरकार गेले तर इथे पुन्हा येऊ शकतील या आशेकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र या लोकांना जातीच्या नावावर फूट पाडून भाजपला रोखायचे आहे”, अस पंतप्रधान मोदी म्हणाले.

बिजनौरच्या सभेत सीएम योगी म्हणाले की, “5 वर्षांपूर्वी दंगल आणि गुन्हेगारी हे पश्चिम उत्तर प्रदेशचे नशीब होते. मात्र आज माफिया जीवाची भीक मागत आहेत. आम्ही चारचाकी चालवू पण गुन्हा करणार नाही, यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांची कधीच काळजी केली नाही. त्यांच्यासाठी गरीब हे नेहमीच राजकारणाचे माध्यम राहिले आहे. आयुष्मान भारतच्या माध्यमातून आमच्या सरकारने त्यांना उपचारांच्या चिंतेतून मुक्त केले आहे, ” असही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद, नगीना, बधापूर, धामपूर, नहतौर, चांदपूर आणि नूरपूर विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या या ऑनलाईन रॅलीचे प्रक्षेपण केले जात आहे. यासोबतच मुरादाबाद जिल्ह्यातील कंठ, ठाकुरद्वार, मुरादाबाद देहत, मुरादाबाद, कुंडरकी, बिलारी विधानसभा येथेही ऑनलाईन प्रक्षेपण सुरु आहे. तर अमरोहाच्या धनौरा, नौगाव सादात, अमरोहा शहर आणि हसनपूर येथेही पीएम मोदींची ऑनलाईन रॅली प्रदर्शित केली जात आहे. या सर्व जिल्ह्यांतील ७५ मंडळांमध्ये एलईडीद्वारे कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जात आहे.


मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण; श्वसनासंबंधित आजार वाढले