Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशUP Assembly : विधानसभेच्या दारावर गुटखा खाऊन कोण थुंकले? अध्यक्षांनी आमदारांना सुनावले

UP Assembly : विधानसभेच्या दारावर गुटखा खाऊन कोण थुंकले? अध्यक्षांनी आमदारांना सुनावले

Subscribe

उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पण अधिवेशनाच्या नवव्या दिवशी विधानसभेच्या प्रवेशद्वारावर घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी संतापून आमदारांना खडेबोल सुनावले आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पण अधिवेशनाच्या नवव्या दिवशी विधानसभेच्या प्रवेशद्वारावर घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी संतापून आमदारांना खडेबोल सुनावले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रवेशद्वारावर कोणत्या तरी आमदाराने थुंकल्याने हा गदारोळ झाला आहे. ज्या कोणा आमदाराने हे कृत्य केले आहे, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत, पण मी त्याचे नाव सार्वजनिकरित्या घेणार नाही, त्यामुळे त्या व्यक्तीने मला वैयक्तिक येऊन भेटावे, असे अध्यक्ष महाना यांनी म्हटले आहे. (UP Assembly Speaker Satish Mahana angry on MLAs who ate gutka and spat on door of assembly)

नेमके प्रकरण काय?

उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी विधानसभेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या एका चुकीच्या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी विधानसभेतील सदस्यांना सभागृहाची प्रतिष्ठा आणि स्वच्छता राखण्याच्या संकल्पाची आठवण करून देत खडेबोल सुनावले आहेत. मंगळवारी (ता. 4 मार्च) विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, सभागृहाच्या प्रवेशद्वारावर गुटखा खाऊन थुंकल्याची माहिती मिळाली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी ताबडतोब तेथे जाऊन त्या ठिकाणची स्वच्छता करून घेतली आणि या बेशिस्त वर्तनाचा निषेध केला. यानंतर त्यांनी सभागृहात येऊन सर्व सदस्यांवर राग व्यक्त केला. तर, विधानसभा ही केवळ एका व्यक्तीची नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले.

तसेच, ज्या कोणत्या सदस्याने विधानसभेच्या प्रवेशद्वारावर थुंकण्याचे कृत्य केले आहे, त्याचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहेत. परंतु, त्या व्यक्तीचे नाव जाहीररित्या घेण्याचा माझा हेतू नाही. त्यामुळे ज्या कोणी हे थुंकण्याचे कृत्य केले आहे, त्याने मला येऊन भेटावे. तर सर्व सदस्यांना आवाहन आहे की, भविष्यात जर त्यांना कोणी असे करताना दिसले तर त्यांनी त्याला तिथेच थांबवावे आणि विधानसभेची प्रतिष्ठा राखण्यासाठी सहकार्य करावे. त्यांनी सभागृहात पुन्हा एकदा या मुद्द्यावर भर दिला आणि उत्तर प्रदेश विधानसभा ही राज्यातील 25 कोटी नागरिकांच्या आदर आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्याची स्वच्छता आणि प्रतिष्ठा राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.