उत्तर प्रदेशच्या तरुणाचे मुंबईत धर्मांतर; पोलीस चौकशी सुरु

संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशः उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने अचानक हिंदू धर्माचा त्याग करुन मुस्लिम धर्म स्विकारला आहे. हा तरुण मुंबईतून आपल्या उत्तर प्रदेशमधील गावी धर्मांतर करुन परतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्या तरुणाचा जबाब नोंदवला आहे. अचानक झालेल्या या धर्मांतराची स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. हे धर्मांतर करणाऱ्या मौलवीला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस लवकरच मुंबईत येतील, अशी माहिती आहे.

उदयराज कोरी असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण आता अहमद हुसैन झाला आहे. तो मुंबईतून उत्तर प्रदेशमधील गावी परतला. त्याचा मुस्लिम पेहराव व त्याच्यामधील अन्य बदलाव बघून सर्वांनाच धक्का बसला. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कोणत्या तरी मौलवीने मला एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओत मुस्लिम धर्माची माहिती होती. त्याने प्रभावित झालो आणि हिंदू धर्माचा त्याग केला, असे त्या तरुणाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. पुढील पोलीस तपास सुरु आहे.

तरुणाच्या धर्मांतरामुळे त्याचे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. माझा मुलाला मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तो नक्कीच मुस्लिम धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्म स्विकारेल, अशी मला आशा आहे, असे तरुणाच्या आईने सांगितले. तर हे धर्मांतर स्वच्छेने केल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले आहे. तरुण सज्ञान आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशी करुनच पुढील कारवाई केली जाईल, असे एसपी ब्रजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश येथील पश्चिम शरीरा पोलीस ठाणे हद्दीतील असाढा गावात हा तरुण राहतो. मुंबईत तो वेल्डींगचे काम करतो. दहा दिवसांपूर्वा तो आपल्या गावी गेला. त्याच्यामध्ये झालेला बदल बघून सर्वचजण हैराण झाले. आधी तो पाया पडून नमस्कार करायचा. आता तो भेटल्यानंतर सलाम बोलू लागला आहे. सुरुवातीला सर्वांचा समज झाला की तो मुंबईतून आला असल्याने त्याचात असा बदल झाला असावा. नंतर मात्र त्याच्यातील धर्मांतराचा बदल समोर आला. तो घरातच नमाज अदा करु लागला. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

हा तरुण मुंबईत शिलाईचे काम करत होता. तेव्हा तो भावंडांसोबत राहत होता. नंतर त्यान हे काम सोडले व वेल्डींगचे काम सुरु केले. तो भावंडांसोबत राहत नसल्याने त्याच्या धर्मांतराबाबत कोणालाचा काही माहिती नव्हते. एएसपी समर बहादुर यांनी सांगितले की, संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी धर्मांतराची तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.