भयंकर, १४ वर्षाच्या मुलाने चिमुरड्यावर सॅनिटाय़झर ओतून त्याला जिवंत पेटवलं

अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलावर सॅनिटायझर ओतून त्याला जिवंत पेटवून दिल्याची भयंकर घटना घडली आहे.

आपल्या आजूबाजूला रोज काहीना काही विविध घटना घडत असतात. त्यातील काही मनाचा ठाव घेतात तर काही मनाला हादरवून टाकतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे घडली आहे. मामाला जेलमध्ये पाठवल्याच्या रागातून एका १४ वर्ष अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलावर सॅनिटायझर ओतून त्याला जिवंत पेटवून दिल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी येथील रेल बाजार मध्ये राहणाऱ्या फिरोजच्या घरी चोरी झाली होती. ही चोरी शेजारी राहणाऱ्या फारूखने केली असल्याचा संशय फिरोजने व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी फारूखला अटक केली होती. फारूखवर त्याचा भाच्याचे अतोनात प्रेम होते. यामुळे मामाला जेल झाल्यापासून तो अस्वस्थ होता. यातूनच त्याने फिरोजला अद्दल घडवण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने दोन दिवसांपूर्वी फिरोजच्या ११ वर्षीय मुलाला खेळण्याच्या बहाण्याने मोकळ्या मैदानात नेले. तिथे गेल्यावर त्याने त्या चिमुरड्याच्या अंगावर सॅनिटायझर ओतले आणि त्यााल जिवंत पेटवून दिले. नंतर त्याने तिथून पळ काढला. बराच वेळ पीडित चिमुरडा आगीत होरपळत मदतीसाठी आरडाओरडा करत होता. पण घटनास्थळ निर्जन असल्याने त्याचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही. अखेर बराचवेळ झाला तरी फारुखच्या भाच्याबरोबर खेळायला गेलेला मुलगा घरी परतला नसल्याने घरातल्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. त्यावेळी घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांना चिमुरडा पेटलेल्या अवस्थेत सापडला. नंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.