जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेक नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरूण यांनीही मनमोहन सिंह यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत.
मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 या कार्यकाळात पंतप्रधान होते. तेव्हा, सिंग यांचे मुख्य अंगरक्षक म्हणून असीम अरूण हे तैनात होते. तेव्हा घडलेला एक किस्सा असीम अरूण यांनी सोशय मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा : मी कमकुवत होतो की नाही…, संयमी मनमोहन सिंगांनी पत्रकाराला एका वाक्यात केलेले शांत
‘एक्स’ अकाउंटवर असीम अरूम यांनी लिहिलं, “मी 2004 पासून जवळपास तीन वर्षे मनमोहन सिंग यांचा बॉडीगार्ड होतो. एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्वात आतील सुरक्षा घेरा असतो, क्लोज प्रोटेक्शन टीम, ज्याचे नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली होती. एआयजी सीपीटी तो व्यक्त असतो, जो पंतप्रधानांपासून कधीही दूर राहू शकत नाही. पंतप्रधानांसोबत एकच बॉडीगार्ड राहू शकतो, तर तो हा व्यक्ती असतो. अशा प्रकारे, त्यांच्यासोबत सावलीसारखं राहण्याची जबाबदारी माझी होती.”
“डॉ. साहेबांची स्वत:ची एकच कार होती – मारूती 800, ही कायम पीएम हाऊसच्या आत चमचमणाऱ्या काळ्या ‘बीएमडब्ल्यू’च्या मागे उभी असायची. मनमोहन सिंग साहेब वारंवार मला म्हणायचे, ‘असीम, मला या गाडीत ( बीएमडब्ल्यू ) बसायला आवडत नाही, माझी गाडी ही आहे ( मारूती 800 ). मी त्यांना समजावायचे, ‘सर, ही गाडी तुमच्या वैभवासाठी नाही, तर तिचे सुरक्षा फीचर्स पाहून ‘एसपीजी’नं ती घेतली आहे.’ मात्र, जेव्हा कारकेड मारूतीसमोरून जायचा, तेव्हा ते नेहमी तिला प्रेमानं पाहायचे, जणू ते आपला ठाम निश्चिय करून पुन्हा-पुन्हा सांगत असायचे, ‘मी मध्यमवर्गीय माणूस आहे आणि सामान्य लोकांची काळजी घेणे ही माझे कर्तव्य आहे. कोट्यवधींची गाडी पंतप्रधानांची आहे, पण माझी गाडी ही मारूती आहे,'” असं असीम अरूण यांनी लिहिलं आहे.
हेही वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, राज ठाकरेंची भावांजली