Uttar Pradesh Election : गरीब कल्याण आणि किसान संमेलनातून यूपीत मिशन ३०० !

BJP Jan Aashirwad Yatra

आगामी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या निवडणूकांच्या निमित्ताने भाजपा मिशन मोडमध्ये एक्टिव्ह झाली आहे. तळागाळातील मतदारांसोबत कनेक्ट करण्यासाठी भाजपने विविध प्रकारचे कॅम्पेन हाती घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपाने गरीब कल्याण संमेलनाची सुरूवात केली आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जनतेसमोर लोकप्रतिनिधींचे कामकाजाचे अहवाल मांडण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहचवण्याच्या उद्देशानेच हे कॅम्पेन हाती घेण्यात आले आहे. हे संमेलन २६ सप्टेंबर २ ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे. राज्यव्यापी अशा संमेलनामध्ये आमदारांसोबतच मंत्र्यांचाही समावेश असणार आहे.

गरीब कल्याण संमेलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाण्याचा आमचा मानस असल्याचे भाजपचे प्रवक्ता मनीष शुक्ला यांनी सांगितले. अशा प्रकारच्या यात्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. बूथ लेव्हलवर लोकांना भेटण्याचा हा प्रयत्न असेल. त्यासाठीच आमदार आणि मंत्री हेदेखील या संमेलनात सहभागी होतील. या भेटीच्या माध्यमातू मंत्री आणि आमदारांचा कार्यअहवालही जनतेसमोर मांडण्यात येईल.

एकट्या उत्तर प्रदेशातच भाजपने ३०० हून अधिक जागा जिंकण्याचे उदिष्ट ठेवले आहे. सध्या उत्तर प्रदेशात भाजपचे अडीच कोटी सदस्य आहेत. ही सदस्यसंख्या ४ कोटी बनवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. या सदस्यसंख्येच्या जोरावरच ३०० हून अधिक जागा जिंकता येतील, असे उदिष्ट भाजपने ठेवले आहे. त्यामुळे दीड कोटींच्या आणखी सदस्यसंख्येसाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. ही सदस्यसंख्या गाठण्यासाठीच भाजप उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात काम करणार आहे.

सर्वसामान्य जनतेसोबतच भाजपचे लक्ष्य हे शेतकरी मतदारही आहेत. त्यामुळेच या शेतकऱ्यांना आपल्या वोटबॅंकचा भाग करण्यासाठी योगींच्या नेतृत्वात १८ सप्टेंबरला शेतकरी संमेलन घेण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी राधा मोहन सिंह, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचीही हजेरी असणार आहे.


हेही वाचा – योगीही म्हणतात ‘मी पुन्हा येईन’, रेकॉर्ड तोडायलाच आलोय सांगत फडणवीसांच्या सुरात सूर