Trainee IAS Officer : नवी दिल्ली : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर हिला पुन्हा एकदा अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली होती, त्याला तिने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी यूपीएससी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरच्या अटकेला स्थगिती दिली आहे. न्या. बी.वी. नागरत्ना आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने अटकपूर्व जामिनाची मागणी करणाऱ्या पूजा खेडकरच्या याचिकेवर दिल्ली सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. (upsc cheating case supreme court protects puja khedkar from arrest till feb 14)
दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे तिच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, पूजा खेडकर हिने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली. आणि पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकर हिला अटक न करण्याचा निर्णय दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना पूजा खेडकर म्हणाली की, माझ्याविरोधातील एफआयआरमध्ये ज्या कागदपत्रांचा किंवा विनंती अर्जांचा उल्लेख केला आहे, ते सरकारी पक्षाकडे आधीपासूनच आहेत. त्यासाठी मला अटक करून त्याची चौकशी करण्याची काहीच आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद तिने केला. पूजा खेडकरवर फसवणूक तसेच चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
पूजा खेडकर हिने तिच्या वागण्यामुळे देशाची प्रतिमा मलीन केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील तिला सिव्हिल सेवा परीक्षा – 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवल्याचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले होते.
जामीन अर्ज फेटाळतानाच न्यायालयाने यापूर्वी तिला दिलेली अंतरिम सुरक्षा देखील रद्द केली. ऑगस्टमध्ये पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. 31 जुलैला यूपीएससीने खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसेच आयोगाने भविष्यातील सर्व परीक्षा आणि मुलाखतींसाठी तिला कायमस्वरूपी बंदी घातली आहे. सिव्हिल सेवा परीक्षा – 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यूपीएससीने तिला दोषी ठरवले आहे. पूजाच्या परिवाराने बोगस दस्तावेज घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी केली असावी, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, या प्रकरणी यूपीएससीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. या चौकशीनंतर आयोगाने तिची निवड रद्द केली. तिला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. तसेच भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास तिला मनाई करण्यात आली.